किरकटवाडी(पुणे): खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने आज (ता. 22) जुलै सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2466 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी संचारबंदी असताना धरणामागील खडकवासला-एनडीए रस्त्यावर असलेल्या मुठा नदीपात्रातील पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

काही अतिउत्साही तरुणांकडून फोटो काढण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचा धोकादायक प्रयत्नही सुरू होता. हे सर्व सुरू असताना पोलिस प्रशासन मात्र कोठेही दिसत नव्हते.

Also Read: ‘गारवा’ हॉटेल मालकाची हत्येची ‘सुपारी’; कटाचा उलगडा

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाणी सोडतानाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो पर्यटक धरणामागील पुलावर गर्दी करतात. यावर्षी मात्र कोरोनाची पार्श्वभूमी तसेच पर्यटन स्थळी घडणारे अपघात या गोष्टींचा विचार करून पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी खडकवासला धरण परिसरात संचारबंदी लागू केलेली आहे. धरणापासून एक किलोमीटरच्या परिसरात नागरिकांना थांबण्यास, वाहने उभी करण्यास व गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने आज पाणी सोडण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली होती. धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती समाज माध्यमांतून पसरली आणि प्रतिबंध असतानाही नागरिकांनी धारणामागे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र नागरिकांची गर्दी झालेली असताना आणि काही तरुण-तरुणींकडून धोकादायकपणे पाण्यात उतरण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासन कोठेही दिसत नव्हते. अखेर पाणी सोडल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर उत्तम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नागरिकांची गर्दी हटविण्यासाठी दाखल झाले.

Also Read: खडकवासला धरणातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here