पुणे : पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या सहा किलोमीटर भुयारी मार्गाचे काम कसबा पेठेपर्यंत गुरुवारी पूर्ण झाले. भुयारी मेट्रोसाठी १२ पैकी ७ किलोमीटर मार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे भुयारी मेट्रोसाठी खोदाईचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. (All Photo Credit – Pune Metro)
दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, शिवाजीनगर न्यायालय, बुधवार पेठ (कसबा पेठ), महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे.
या भुयारी मार्गाच्या कामासाठी ३ टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत ७ किमीचा (१२ किमी पैकी) भुयारी मार्ग तयार केला आहे. दोन टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे काम सुरू झाले असून एक टनेल बोरिंग मशीन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे.
कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्ग तयार करणारे टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ येथे गुरुवारी पोचले. मेट्रोच्या तांत्रिक भाषेत यास ‘ब्रेक थ्रू’ म्हंटले जाते. कृषी महाविद्यालय येथून २९ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिले टनेल बोरिंग मशीन “मुठा” व गेल्यावर्षी ३० नोव्हेंबर रोजी दुसरे टनेल बोरिंग मशीन “मुळा” ने कामाला प्रारंभ केला.
सध्या शिवाजीनगर न्यायालय स्थानक पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ स्थानक (कसबा पेठ) येथे “मुठा” टनेल बोरिंग मशीन पोहचत आहे. पुणे मेट्रोच्या कामाचा हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. दुसरे टनेल बोरिंग मशीन “मुळा” लवकरच बुधवार पेठ स्थानकात पोहचणार आहे.
भूमिगत मेट्रो मार्ग नदीच्या खालून जात असलेले पुणे हे देशातील चौथे शहर आहे. याआधी मुंबई (मिठी नदी), कलकत्ता (हुगळी नदी), आणि चेन्नई (कुम आणि अद्यार) या शहरांत टनेल बोरिंग मशीनने भूमिगत मेट्रोसाठी नदीच्या खालून बोगदा तयार केला आहे.
मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे ३३ मीटर खोल असून, नदी पात्राच्या तळापासून साधारणतः १० मीटर खालून जात आहे. आज पुणे मेट्रोचे सध्या ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रो ट्रेन चालवण्याची चाचणी गेल्यावर्षी घेण्यात आली होती. याच मार्गाचे ४ जुलै रोजी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांनी निरीक्षण केले. त्यामुळे तेथे मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीच्या दिशेने सुरुवात झाली आहे. मेट्रोची वनाज येथूनही चाचणी ७ जुलै रोजी झाली. काम पूर्णत्वाकडे जाईल तशी वनाझ ते गरवारे पर्यंत मेट्रो चालवण्याची चाचणी घेण्यात येईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here