कऱ्हाड शहरासह तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कऱ्हाडला एनडीआरएफचे (NDRF) पथक दाखल करण्यात आले आहे.

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड शहरासह तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कऱ्हाडला एनडीआरएफचे (NDRF) पथक दाखल करण्यात आले असून आज ते पथक कऱ्हाडला दाखल झाले आहे.
त्यांच्यामार्फत शहरासह तालुक्यातील पूरस्थिती निर्माण झालेल्या परिसरात मदत कार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आज दिली.
तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले, नद्या भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक नद्या व उपनद्यांचे पाणी पात्राबाहेर येऊन नागरी वस्तीत घुसू लागले आहे. कऱ्हाडच्या पाटण कॉलनी अन्य ठिकाणची कुटुंबे काल रात्रीच नगरपालिका व प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत.
नदीकाठच्या गावांमध्येही पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर तातडीने मदत उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाकडून जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाडला एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
संबंधित टीमला तहसीलदार वाकडे यांच्याकडून माहिती देण्याचे काम सुरू आहे. मंडलाधिकारी विनायक पाटील, तलाठी व अन्य कर्मचारी तेथे उपस्थित आहेत. संबंधित टीममार्फत आवश्यक असेल तेथे तातडीने मदत पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here