शिरोली पुलाची (कोल्हापूर) : सांगली (Sangli)फाटा येथे महापुराचे पाणी आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore National Highway)वाहतूक ठप्प झाली. यामुळे महामार्गावर सुमारे दोन हजार वाहने अडकून पडली आहेत. ऑगस्ट २०१९ नंतर महामार्गावर पाणी आली असून, पाणी अत्यंत वेगाने वाढत आहे. या पाण्याच्या प्रवाहातून एक कार व दहा मोटर सायकल वाहून गेल्या. कार चालकाला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक मच्छीमाराच्या मदतीने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कारचालकाला वाचविण्यात पोलीस प्रशासनास यश आले. समीर सनदे या माच्छिमाराने इनरच्या सहाय्याने कार चालकाला बाहेर काढले. (Pune-Bangalore-National-Highway-2000-vehicles-lock-pulachi-shiroli-kolhapur-rain-update-akb84)
संततधार पावसामुळे काल सायंकाळी सेवा मार्गावर पाणी आले होते. त्यानंतर पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने, दुपारी अडीच वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आले. सुमारे दीड ते दोन फुट पुराचे पाणी मार्गावर असताना, त्यामधून पुण्याच्या दिशेने वाहतूक सुरू होती. त्यानंतर तासाभरतच यामार्गावरील पाणी वाढल्याने, बॅरेक्टस लावून वाहतूक बंद करण्यात आली. यानंतर कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. दोन तासामध्येच पाणी महामार्ग दुभाजकावरून वाहू लागले. त्यामुळे शिरोली पोलीस प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक बंद केली आणि राष्ट्रीय महामार्गावर पूर्णतः ठप्प झाला आणि कोल्हापूरचा संपर्क तुटला.
सांयकाळी सातच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे पाच फूट पाणी होते तर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे तीन ते चार फुट पाणी आहे. यापूर्वी २००५ व २०१९ ला महामार्गावर पाणी आले होते. दोन वर्षापूर्वी ५ ऑगस्ट २०१९ला महामार्गावर पाणी आले तेव्हा तब्बल आठ दिवस महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. यावेळी २०१९ च्या तुलनेत वेगाने पाणी वाढले असून, पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. सांगली फाटा, नागाव फाटा, महाडिक बंगला येथे पोलीस बंदोबस्त असून, महामार्गावरील वाहतूक बॅरकेट लावून बंद केली आहे.
Also Read: इंधनरपुरवठा अत्यावश्यक सेवेसाठीच :जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
शिरोली पोलीसांनी महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतरही तावडे हॉटेलकडून पुण्याच्या दिशेने वाहन येत होती. पाण्याच्या प्रवाहातून धाडस करून वाहन येत होती. यावेळी सुमारे दहा मोटरसायकली वाहून गेल्या. चालकाने गाडी सोडून दिल्यामुळे जिवीत हानी झाली नाही.

सायंकाळी सातच्या सुमारास वॅगनर कारचालकाने पाण्याच्या प्रवाहातून येण्याचा प्रयत्न केला. प्रवाहामुळे कार वाहून गेली, तर कारचालक वीजेच्या खांबाचा आधार घेऊन वाचला. त्या कारचालक बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन व माजी आमदार अमल महाडिक, स्वरुप महाडिक कार्यकर्त्यांसह प्रयत्न करीत होते. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, तहसीलदार प्रदिप उबाळे यांच्याकडे मदत मागितली.

महापुराची परिस्थिती गंभीर बनत असून, पाणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे वाहनधारक व प्रवशांनी धोका पत्करून प्रवास करू नये.
किरण भोसले, सहायक पोलीस निरीक्षक
Esakal