इचलकरंजी (कोल्हापूर) : कोयना धरणातून (Koyna Dam) होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या (Panchganga River) पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ झाली. 24 तासात दहा ते बारा फूटाने वाढ झाल्याने नृसिंहवाडी दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहे. तर नृसिंहवाडी, कुंरूदवाड येथील नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

धरणपाणलोट क्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसाबरोबर कोयना धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ झाली. 24 तासात दहा ते बारा फूटाने वाढ झाली आहे. त्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. आज गुरूपौणिमे दिवशीच मंदिर पाण्याखाली गेले असून मंदिराजवळील औदुंबराचे झाडाचे अस्तित्व दिसत आहे. श्री ची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी, कुंरूदवाड भैरेवाडी परिसरातील नागरी वस्तीत पूराचे पाणी आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.शुक्रवारी दिवसभर घरातील साहित्य घेऊन नागरिक स्थलांतरित होत होते.(Datta-temple-in-Nrusinhawadi-underwater-kolhapur-rain-update-kurundwad-Ichlkarnji-rainfall-live-news-akb84)

मळे भागातील नागरीकांना स्थलांतराच्या सुचना ; 4 शाळांमध्ये छावण्या सुरू

इचलकरंजी: संततधार सुरू असलेल्या पावसाने शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास काही तासात 71 फूट धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी नागरीवस्तीजवळ आल्याने प्रशासनाने मळे भागातील नागरीकांना स्थलांतराच्या सुचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या सूचनेनंतरही नागरिक स्थलांतर करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेळके मळ्यात प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. विविध 4 शाळांमध्ये त्यांच्यासाठी छावण्या सुरू केल्या आहेत.

पुन्हा महापुराची शक्यता

दरम्यान पाटील मळा,कोल्हे मळा, स्वामी मळा भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.पालिका प्रशासनाने अशा सखल भागात युद्धपातळीवर जेसीबीच्या साहाय्याने साठलेल्या पाण्याला अन्य मार्गाने वळवले.पावसामुळे मात्र शहरातील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प राहिले.इचलकरंजीसह पाणलोट क्षेत्रात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा महापुराची शक्यता वर्तवली जात आहे. नदीवरील लहान पुल आणि नदीकाठावरील सर्व शेतजमीन, वरविनायक मंदिर, महादेव मंदिर, स्मशानभुमी पाण्याखाली गेली आहे.

Also Read: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 2000 वाहने अडकली

पोलिस बंदोबस्तात स्थलांतराची मोहीम

पुराचे पाणी नागरीवस्तीजवळ आल्याने प्रशासनाने नागरीकांना सतर्क केले आहे. स्थलांतराच्या सुचना केल्या आहेत. नगरपालिकेच्या आदि व्यंकटराव, पद्मावती, तांबे माळ आणि शाळा नं. 6 या शाळेत स्थलांतरीत नागरीकांसाठी छावण्या सुरू केल्या आहेत. पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास काही तासातच धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन शुक्रवार सकाळपासून पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतराच्या वारंवार सूचना देत आहे. मात्र नागरिक घरातून बाहेर पडण्यास तयार नव्हते.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात स्थलांतराची मोहीम हाती घेतली आहे.

भोने मळ्यात झाड कोसळले

भोने मळा येथील सरस्वती हायस्कूलनजीक असलेले भलेमोठे जुने झाड शुक्रवारी दुपारच्या सुमारास रस्त्यावर कोसळले. सुदैवाने त्याखाली कोणी सापडले नाही. मात्र या मार्गावरील वाहतूक ठप्प राहिली. प्रशासनाने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.मात्र गेल्या चार पावसामुळे शहरात झाड कोसळण्याची ही दुसरी घटना ठरली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here