पुणे – राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी (Rain) व त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी, यामुळे अनेक ठिकाणी पुर (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा पुराचा तडाखा बसला आहे. नागरी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय लष्कराने (Indian Army) पूरग्रस्त भागांमध्ये स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात केली आहेत. (Indian Army Deployed Relief and Rescue Teams in the Flood Hit Areas)

‘ऑपरेशन वर्षा २१’च्या अंतर्गत औंध लष्करी तळ आणि पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर समूहाची एकूण १५ मदत आणि बचाव पथके रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आली होती. ही पथके परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नागरी प्रशासनाला मदत करणार आहेत.

भारतीय लष्कर या संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी आहे आणि सैन्याकडून सर्व मदत पुरवली जाईल. पूरग्रस्त भागातून हलविण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी मदत पथकांमध्ये अभियंते आणि लष्करातील वैद्यकीय पथकाचा समावेश करण्यात आला आहे. असे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी सांगितले.
Esakal