-जितेंद्र विसपुते
औरंगाबाद: आवड, आर्थिक उत्पन्न, पीकपद्धती, भौगोलिक व सामाजिक घटक यांचा आपल्या दैनंदिन आहारावर मोठा परिणाम होत असतो. यातूनच आहार ठरविला जातो. तथापि, भारतीयांच्या दैनंदिन आहाराची माहिती संकलित करून त्याचे शास्त्रशुद्ध अध्ययन करत भारतासाठी भविष्यकालीन धोरण आखता यावे याकरिता केंद्र शासनाच्या, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून (आयसीएआर) जर्मनीत, युनिव्हर्सिटी ऑफ पोट्सडॅमच्या सहकार्याने संशोधन केले जात आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या अध्ययनाची धुरा शास्त्रज्ञ तुषार रामचंद्र आठरे (रा. वैजूबाभूळगाव, जि.अहमदनगर) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शास्त्रज्ञ तुषार आठरे हे आयसीएआर या संस्थेच्या, जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट (अटारी) येथे कार्यरत आहेत. अटारी ही आयसीएआर या संस्थेचाच एक भाग आहे. त्यांच्या अंतर्गत जर्मनीत वर्ष २०१७ पासून भारतीयांच्या आहारावर संशोधन सुरू आहे. ते ‘भारतीयांचा दैनंदिन आहार आणि अन्नधान्य उत्पादनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम’ या विषयावर युनिव्हर्सिटी ऑफ पोट्सडॅम येथे पीएचडी करीत आहेत. यासाठी त्यांनी आयसीएआरची नेताजी सुभाष आयसीएआर इंटरनॅशनल फेलोशिप मिळविली आहे. आठरेंचे हे संशोधन आता अंतिम टप्प्यात आहे.

Also Read: नंदीग्राम, पनवेल, राज्यराणीसह ६ तपोवन एक्स्प्रेस पाच दिवस बंद
त्यांनी भारतीय आहाराचे वर्गीकरण तांदूळ, गहू, कडधान्य, तेलबिया, दुग्धजन्य, सी-फूड, पालेभाज्या, फळे आदी ११ प्रकारांत केले आहे. भारतीयांच्या आहारात डाळी, फळे आणि हिरव्या भाज्यांचा वापर कमी असल्याचे त्यांना आढळून आले आहे. चांगले आरोग्य आणि पर्यावरणासाठी नागरिकांच्या सवयींत आणि दैनंदिन आहारातील तोचतोपणा यात बदल होणे गरजेचे असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
राज्यातील मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, विदर्भातील वाशीम, गोंदिया, गडचिरोली, खानदेशातील धुळे, नंदुरबार, कोकण विभागातील पालघर, ठाणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील नागरिकांच्या आहारात असमतोल असल्याचे आतापर्यंत झालेल्या या संशोधनातून समोर आले आहे. या भागांतील बरेच नागरिक पुरेसे उष्मांक (कॅलरी) असलेल्या विविध अन्नपदार्थांचे सेवन करीत नसल्याचेही नोंदविण्यात आले आहे.
Also Read: जोमात आलेले खरिपाचे पिके पाण्यात; नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
भारतीय कृषी अनुसंधान परिषद या संस्थेअंतर्गत भविष्यातील धोके ओळखून संशोधने केली जातात. शासनाला पीक व्यवस्थापनाबाबत धोरण तयार करण्यासाठी सहकार्य केले जाते. संशोधन अभ्यासातून भारतातील कोणत्या भागात कोणते अन्नपदार्थ कमी-अधिक सेवन केले जातात? तो आहार सकस आहे का? पीकपद्धतीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? आदी निष्कर्ष समोर येतील. यावरून ‘आयसीएआर’ला भविष्यकालीन नियोजन करता येईल आणि पर्यायाने याचा संपूर्ण देशाला लाभ होईल असे आठरे यांनी सांगितले. देशातील एक लाख ८० हजार घरांमधील आहाराची माहिती (डेटा) यासाठी आठरे यांनी अभ्यासली आहे.
शास्त्रज्ञ आठरे यांचे संशोधन आता अंतिम टप्प्यात आले आहे. भारतीयांच्या आहारातील असमतोलासह पीकपद्धतीचा वातावरण बदलावर होणारे परिणाम ते अभ्यासत आहेत. या अध्ययनाचा भारतीयांना खूप चांगला लाभ होईल. आमच्यासोबत ‘अटारी’अंतर्गत ते संशोधन करीत असल्याचा आनंद आहे.
-डॉ. येर्गन क्रुप, प्रोफेसर, पोट्सडॅम युनिव्हर्सिटी, जर्मनी
Also Read: ‘परिवहन सोडता शासनाच्या इतर विभागांत नोकऱ्या द्या’
आठरे यांच्याकडून होत असलेले अध्ययन महत्त्वपूर्ण असून याचा शासकीय यंत्रणांसह अभ्यासक, संशोधकांना उपयोग होईल. भारतीय नागरिकांचा आहार परिपूर्ण कसा होईल? यासाठी धोरण ठरविताना त्यांची माहिती उपयुक्त ठरेल. अटारीच्या अंतर्गत याबाबत जर्मनीत २०१७ पासून ते पीएचडी करीत आहेत. लवकरच त्यांचा संशोधन अभ्यास पूर्ण होऊन निष्कर्ष हाती येतील.
-डॉ.एस.आर.के. सिंग, निदेशक, आयसीएआर, अटारी, जबलपूर
Esakal