वसमत (हिंगोली): वसमत तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मयत व्यक्तीवर चक्क रस्त्यालगतच अंत्यसंस्कार केले. यावेळीही पाऊस येत असल्याने काही जणांनी ताडपत्री धरली होती. वसमत तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे आसना नदीच्या पलीकडल्या बाजूला स्मशानभूमी आहे. या ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्ताही नाही. त्यामुळे गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामपंचातीने रस्त्याच्या मागणीसाठी पंचायत समितीकडे ठराव देखील दिले होते. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.

दरम्यान, आज गावातील केशव शिवराम वाघमारे (७५) यांचे निधन झाले. मात्र सततच्या पावसामुळे नदीला थोडे पाणी होते. तर पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. या परिस्थितीत चिखल तुडवत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे वाघमारे कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मात्र ऐनवेळी जागा कशी उपलब्ध करावी असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या वाघमारे कुटुंबियांनी जो पर्यंत जागा मिळत नाही तो पर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भुमिका घेतली.
Also Read: कर्जमाफी कधी होणार? २७ हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अरविंद बेळंगे यांनी तातडीने मंडळ अधिकारी कवठेकर व तलाठी डाके यांना गावात पाठविले. तसेच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, जमादार आडे, जमादार विभुते, चव्हाण यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बोरगाव बुद्रक ते किन्होळा रस्त्याच्या लगत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीही मोठा पाऊस पडत असल्याने काही तरुणांनी मोठी ताडपत्री लाकड्याच्या मदतीने धरल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.
Esakal