Tokyo Olympics IND vs NED Womens Hockey : भारतीय महिला हॉकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळणाऱ्या रानीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. जागतिक महिला हॉकी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नेदरलँडने सामन्याच्या 5 व्या मिनिटाला पहिला गोल डागला. भारताची कर्णधार कर्णधार रानी रामपालने 10 व्या मिनिटाला गोल करत पहिल्या क्वार्टरमध्येच बरोबरी करुन तगडी फाईट देण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला. दुसऱ्या हाफपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये नेदरलँडने 3 तर अखेरच्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एक गोल डागत नंबर वन नेदरलँड महिलांनी भारतीय महिलांना मोठ्या फरकाने पराभूत केले.
36 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिला संघाने पहिल्यादांच सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरलाय. 2017 आशियाई कप जिंकून भारतीय महिला संघाने आपली क्षमता सिद्ध केलीये. एवढेच नाही तर 2018 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई आणि महिला विश्वचषक क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारत महिला संघाने कोणत्याही संघासोबत भिडण्यासाठी सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. पहिल्या सामन्यात भारतीय महिला दमदार कामगिरी करतील, असे वाटत होते. पण त्यांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागलाय.

2019 एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकाला शह देत भारतीय महिलांनी टोकियोचे तिकीट पक्के केले होते. पहिल्याच सामन्यात त्यांची तगड्या नेदरलँडशी टक्कर झाली. यात त्यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
पहिल्या क्वार्टरमध्ये कांटे की टक्कर, तिसऱ्या क्वार्टरमध्ये डाव पलटला
पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने बचावफळी मजबूत असल्याची अनुभूती दिली. पहिल्या क्वार्टरमधील खेळ संपण्यापूर्वी नेदरलँडला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण उत्तम बचाव करत भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचे गोल करण्याचा मनसूबा उधळून लावला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये नेदरलँड संघाने आपला नंबर वन रुबाब दाखवू दिला. पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतरीत केल्यानंतर पुढच्या तीन मिनिटांत नेदरलँडने दोन गोल डागत आघाडी भक्कम केली. शेवटच्या क्वार्टरमध्ये यात आणखी एका गोलची भर घातली.
Esakal