आज पहाटे सोळा वर्षांपूर्वीचा महापुराचा टप्पा कृष्णा नदीने ओलांडला.

सांगली: सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथगतीने सातत्यपूर्ण वाढ सुरूच असून आज पहाटे सोळा वर्षांपूर्वीचा महापुराचा टप्पा कृष्णा नदीने ओलांडला. सकाळी साडे सात वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ५५ फूट इतकी होती. रात्री शहरातील रिसाला रोड, गणपती पेठ, स्टेशन चौक, बायपास रोड, आंबेडकर रोड, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पुराचे पाणी आले.

सांगलीत काल शनिवारी पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. तर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला होता. शिवाय अलमट्टी धरणातून साडे तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता आणि कोयनेचा विसर्ग तीस हजारपर्यंत कमी करण्यात आला होता. तरीही कृष्णा नदीचे पाणी संथगतीने वाढतच राहिले.

कृष्णाची पाणीपातळी सांगलीत आयर्विन पुलाजवळ बावन्न फुटांपर्यंत जाईल अशी अपेक्षा होती. मात्र रात्रभर यात वाढच होत राहिली आज सकाळी साडेसात पर्यंत या पाणीपातळीत तब्बल तीन फुटांची वाढ होऊन ५५ फूट इतकी पाणी पातळी झाली होती. २००५ मध्ये ५३.७ फूट इतकी विक्रमी पाणी पातळी झाली होती. तो टप्पा पार करून कृष्णेचे पाणी ५५ फुटांकडे वाटचाल करत आहे. पाटबंधारे विभागाने ५२ फुटांवर सकाळपर्यंत पाणी पातळी स्थिर राहून त्यानंतर पाणी ओसरू लागेल असा इशारा दिला होता. तो सुद्धा आता फोल ठरला आहे.

शहरातील गणपती पेठ, स्टेशन रोड, बायपास रोड, आमराई, आंबेडकर रोड या भागातही पुराचे पाणी आले आहे. आकाशवाणी परिसरातील शामराव नगर भागातील उपनगरेही पाण्याखाली गेली आहेत. पाणी उपसा केंद्र पाण्यात गेल्याने पाणी पुरवठा हे ठप्प झाला आहे. शिवाय पुराचे पाणी आलेल्या उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here