बीड : सर्वच कुटूंब अशिक्षित, रोजीरोजगार करुन कुटूंबाची गुजरान, अनेकदा जेवणाची भ्रांत, कधी आईसोबत रोजगार हमीच्या कामावर, तर कधी दोन रुपये रोजाने कोणाच्या शेळ्या सांभाळाच्या. शाळेत शिक्षणासाठी (Education) नाही तर सुकडी मिळते म्हणून जायचे. म्हणून फक्त सुकडीसाठी सलग तीन वर्षे पहिलीला जाऊन इयत्ता पहिली उत्तीर्ण होण्यासाठी वयाचे नऊ वर्षे लागले. वय अधिक असल्याने चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा देता आली नाही. पण, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. तेव्हा शिक्षकांनाही कळाले मुलगा हुशार आहे. मग, त्यानेही जिद्दीने अभ्यास करुन वैद्यकीय शिक्षणासाठी (एमबीबीएसला) (MBBS) प्रवेश मिळविला आणि आता मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून काम पाहतात. ही संघर्ष आणि यशकथा आहे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (Swami Ramanand Thirth Medical College And Hospital, Ambajogai)आणि नंदूरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे (Dean Dr.Shivaji Sukre) यांची. विशेष म्हणजे राज्यभरात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे डीन म्हणून काम करणाऱ्यांत एकमेव डॉ. शिवाजी सुक्रे असे आहेत की ज्यांच्याकडे दोन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार आहे.(Success story of doctor shivaji sukre who dean of two medical colleges glp88)

Also Read: औरंगाबादच्या २२ गावांतील ३० बालविवाह रोखले, तिला शिकू द्या ओ!
जालन्यापासून ४० किलोमीटर अंतरावरील नेर येथील सुक्रे हे आदिवासी कुटूंब. डॉ. शिवाजी सुक्रे हे समिंद्राबाई व बाळाभाऊ मुंजाजी सुक्रे यांचे चिरंजीव. त्यांना गंगाराम सुक्रे व बाबुराव सुक्रे हे दोन चुलते. शिक्षणाचा आणि कुटूंबाचा दुरान्वये संबंध नाही. भूमिहीन कुटूंब सुरुवातीला रोजंदारी करुन गुजरान करायचे. नंतर वडील बाळाभाऊ व चुलते बाबुराव यांनी आठवडे बाजारात हॉटेल सुरु केले. नेरला बुधवारच्या व परिसरातील डांबरी येथील गुरुवारच्या आठवडे बाजारातील हॉटेलवर चहा, भजे, जिलेबी असायची. आई परिसरातील हिवरडी येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर जायची तेव्हा सोबत जाणारे शिवाजी सुक्रे वडिलांना हॉटेलवर मदत करायलाही जायचे. शाळेत जाण्याचे कोणाच्याच डोक्यातही नसे. रोजगार हमी योजनेवरील कामाची रोजंदारी, लोकांच्या शेतातील कामाची रोजंदारी आणि आठवड्यातून दोन दिवस चालवलेल्या हॉटेलमधून मिळणारी आमदनी यातून सुक्रेंच्या तीन कुटूंबियांचा गाडा चाले. अनेकदा जेवण मिळायचे नाही म्हणून सुकडी, बरबडा आणि सिंधीचा गर खावून दिवस काढावे लागायचे. लहान असताना भाकरीसोबत खाण्यासाठी पाट्यावर चटणी वाटल्यानंतर पाटा-वरवंटा धुतलेल्या पाण्यात भिजवून भाकर खावी लागे.
Also Read: मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप
तोंडाची आग पडायची पण पोटाची आग शांत करण्यासाठी तेच खावे लागे, असे डॉ. शिवाजी सुक्रे सांगतात. स्वत: देखील दोन रुपये रोजाने लोकांच्या शेळ्या, जनावरे सांभाळलेली आठवण आजही त्यांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान, सुक्रे कुटूंबियांचा आणि शिक्षणाचा दुरान्वये संबंध नसल्याने शिवाजी सुक्रे यांना शाळेत घालावे किंवा त्यांनी शिकावे असे कोणाच्याच काही डोक्यात नव्हते. पण, त्या काळात विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून सुकडी दिली जाई. केवळ सुकडी मिळेल आणि भुक भागावी म्हणून शिवाजी सुक्रे पहिलीत गेले. फक्त सुकडीसाठी ते सतत तीन वर्षे पहिलीच्याच वर्गात जात. १९६८ साली जन्म झालेल्या डॉ. शिवाजी सुक्रे १९७७ साली नवव्या वर्षी पहिलीला उत्तीर्ण झाले. १९८१ साली चौथीला असताना शिष्यवृत्ती परीक्षा द्यायची होती. पण वय अधिक असल्याने देता आली नाही. मग, सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा दिली आणि जालना जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा तत्कालिन विभागीय आयुक्त अरुण बोंगीरवार यांच्या हस्ते गौरव झाला. यात शिवाजी सुक्रे यांनाही गौरविण्यात आले. याच्या दैनिकांमध्ये बातम्या व फोटोही प्रसिद्ध झाले. याच दरम्यान रोजंदारी व हॉटेलच्या उत्पन्नातून सुक्रे कुटूंबियांनी काही शेती खरेदी केली होती. कुटूंबियांची परिस्थिती काहीशी रुळावर येत होती. मुलगा शिवाजी सुक्रेंचे यशामुळे कौतुक आणि बाळाभाऊंचेही अभिनंदन होत होते. मुलगा हुशार आहे, त्याला शिकू द्या, शाळेतून काढू नका, असा सल्ला हिंदीचे शिक्षक नुर मोहम्मद यांनी बाळाभाऊंना दिला. मग, ते नियमित शाळेत जाऊ लागले. नववीपर्यंत नेरच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांचे शिक्षण झाले. दहावीला जालना येथील सरस्वतीभुवन शाळेत प्रवेश घेतला. राहण्या-खाण्याची व्यवस्था समाज कल्याण विभागाच्या संत रामदास वसतीगृहात झाली. दहावीलाही चांगले गुण मिळाले आणि मग औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात ११ वीला प्रवेश घेतला. पद्मपुरा भागातील संत तुकाराम महाराज या समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात राहून त्यांनी १२ वीपर्यंत शिक्षण पुर्ण केले.
Also Read: माणुसकीची एैसीतैसी! मदत न करता कंटनेरमधील बिअरचे बाॅक्स पळविले
बारावीत चांगले गुण मिळाले आणि त्यांचा वैद्यकीय शिक्षणासाठी (एमबीबीएस) औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) (Government Medical College And Hospital, Aurangabad) प्रवेश निश्चित झाला. एमबीबीएस पुर्ण झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील लाखणी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची वैद्यकीय अधिकारी (Medical Education) म्हणून नेमणूक झाली. मात्र, काही दिवसांनी त्यांचा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (शल्यविशारद) शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी नंतर २००१ साली ते सहायक प्राध्यापक म्हणून पुन्हा घाटीत रुजू झाले. जुलै २००८ मध्ये त्यांची सहायक प्राध्यापक म्हणून निवड झाली. तर महिनाभरातच त्यांना वैद्यकीय उपअधीक्षक म्हणून याच ठिकाणी नेमणूक मिळाली. तीन वर्षांनी २०११ साली ते वैद्यकीय अधीक्षक झाले. तर, २०१४ साली प्राध्यापक म्हणून पदोन्नतीनंतर ते मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात (J.J.Hospital, Mumbai) रुजू झाले. तर, पुन्हा २०१६ साली त्यांची औरंगाबादच्या घाटी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विभाग प्रमुख व उपअधिष्ठाता म्हणून त्यांची नेमणूक झाली. १२ डिसेंबर २०१९ साली प्रथम त्यांची नंदूरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर नेमणूक झाली. आता नंदूरबारसह अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचाही वर्षभरापासून त्यांच्याकडे पदभार आहे. राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांमध्ये डॉ. शिवाजी सुक्रे एकमेव आहेत की त्यांच्याकडे दोन वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातापदाचा पदभार आहे.
Also Read: ‘आगामी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा विजय’
पेच : कॅशिअर म्हणून रुजू झाले असते तर….
सुकडीसाठी शाळेत गेलेल्या डॉ. शिवाजी सुक्रे यांनी आपले नववीनंतरचे सर्व शिक्षण समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात राहून पुर्ण केले. १२ वी परीक्षेनंतर निकालापूर्वी समाज कल्याण विभागाचे वसतीगृह बंद होते. त्यावेळी औरंगाबादेत राहायचे कुठे आणि खायचे काय, असा प्रश्न होता. त्यावेळी औरंगाबादच्या एका हॉटेलात बँकिंगच्या लेखी परीक्षा व मौखिक चाचणीचे प्रशिक्षण वर्ग सुरु होते. या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहणाऱ्यांना दुपारचे जेवण आणि दहा रुपये भत्ता अशी जाहीरात त्यांनी वाचली. मग, या बँकिंग वर्गाला प्रवेशही घेतला आणि बँकेसाठी फॉर्मही भरला. जेवणाची व राहण्याची सोयही झाली. परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्णही झाले. २९ जुलै रोजी त्यांची कॅनरा बँकेत कॅशिअर कम क्लार्कपदासाठी निवड झाली. कुटूंबियांचा आनंद गगनाला मावेना. कारण, सुक्रे कुटूंबात प्रथमच कोणीतरी शिकले होते आणि नोकरीही मिळणार होती. सर्वांचा आग्रह होता रुजू व्हावे. पण, १२ वीमध्ये चांगले गुण मिळाल्याने वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश निश्चित मिळेल, अशी शिवाजी सुक्रेंना खात्री होती. म्हणून त्यांनी बँकेत रुजू होणे टाळले. बँकेत रुजू झाले असते तर शाखा व्यवस्थापक वा विभागीय व्यवस्थापकपदापर्यंत ते आतापर्यंत पोचले असते. पण, दोन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनपदाचा एकमेव असलेला मान त्यांना मिळाला नसता.
Esakal