विकी डोनरला जितक्या सहजतेनं प्रेक्षकांनी स्वीकारलं तेवढ्या सहजतेनं ते मिमिला स्वीकारतील असं वाटत नाही. याचं कारण आता तो विषय बऱ्यापैकी लोकांना माहिती झाला आहे. विकी डोनर मध्ये स्पर्म डोनेट ही संकल्पना होती. मिमिमध्ये सरोगसी ही संकल्पना आहे. याविषयी प्रेक्षकांना माहिती आहे. मात्र या सरोगसी हा बिझनेस कसा झाला आहे. अनेकांनी त्याला आपल्या उपजिविकेचा म्हणून कसा वापर केला आहे याबद्दल प्रेक्षकांना तितकसं माहिती नाही. मध्यंतरीच्या काळात त्यावर काही बातम्या आणि लेखही प्रसिद्ध झाले होते. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित मिमिमध्ये प्रेक्षकांना त्याविषयी जाणून घ्यायला आवडलं असतं. पण त्यातील सरोगसीच्या संकल्पनेचा विस्तार करताना तो फारच उथळ झालायं. असं म्हणता येईल. कदाचित त्यात सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता पंकज त्रिपाठी नसता तर काय झालं असतं ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
मिमिच्या वाट्याला फारसं यश मिळेल याबद्दल शंका आहे. त्यात ना कथेला वाव आहे, ना अभिनयाला, मध्यंतरापूर्वी चित्रपट बऱ्यापैकी पकड घेतो. त्यानंतर तो कमालीचा कंटाळवाणा होऊन जातो. राजस्थानातील एका गावामध्ये असलेल्या मिमीला बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री व्हायचं आहे. त्यासाठी तिला मुंबईला जायचंय, तिथे फोटोशुट करायचं आहे, मात्र तिला पैशांची गरजही आहे. तिच्या कायम सोबत असणारी शमा वेळोवेळी तिला साथ देणारी. अशा सगळ्या परिस्थितीत एक अमेरिकन जोडपं राजस्थानात फिरायला येत. त्यांना गेली कित्येक वर्ष मुलबाळ नाही. त्यामुळे ते सरोगसीच्या माध्यमातून मुल जन्माला घालायचं असा निर्णय घेतात. त्यासाठी त्यांना एक कणखर, धडधाकट महिला हवी असते. परम सुंदरीच्या निमित्तानं त्यांचा मिमिशी संबंध येतो. यानंतर कथा एका वेगळ्या दिशेला वळण घेते.

एका गंभीर विषयाला विनोदाची फोडणी देऊन तो विषय प्रभावीपणे ठसविण्याचा उत्तेकर यांचा प्रयत्न कौतूकास्पद आहे. त्यांनी अनेक प्रसंगामध्ये कमालीची रंगत आणलीय. काही प्रसंग आपल्याला मनमुराद हसवतातही. भानु (पंकज त्रिपाठी) सगळ्या कथेचा सुत्रधार. मिमिला कनव्हिन्स करणं, पैशांची बोलणी करणं, एवढेच नाही तर जेव्हा प्रसंग अंगाशी येतो तेव्हा मिमिच्याच घरात तिचा पती बनुन राहणं हे सगळं चक्रावून टाकणारं आहे. त्यामुळे पंकज त्रिपाठीचा वावर सगळीकडे दिसतो. त्यानं ज्यापद्धतीनं स्क्रिनवर छाप पाडलीय त्याची दाद द्यावी लागेल. अन्यथा मिमि पूर्ण पाहणं रटाळवाणं झालं असतं.

समृद्धी पोरे यांच्या मला आई व्हायचंय या पुरस्कार प्राप्त चित्रपटावर आधारित असलेल्या मिमिमध्ये गाणी मात्र लक्ष वेधून घेणारी आहेत. ए आर रहमान यांचं संगीत लाभलेल्या मिमित परम सुंदरी गाणं भारीच आहे. संवाद बोलके आहेत. क्रिती, सई वगळता बाकी सर्वांचा अभिनय लक्षात राहणारा आहे. दोन परदेशी कलाकार आयडेन व्हायहॉक आणि इव्हेलेन एडवर्डस यांनी देखील सुंदर भूमिका वठवल्या आहेत. मिमिच्या आई वडिलांची भूमिका करणाऱ्या सुप्रिया पाठक आणि मनोज पहावा यांनीही प्रभावी काम केलं आहे. तर मिमि सरोगसीच्या माध्यमातून त्या परदेशी जोडप्याला मुलं द्यायला तयार होते. त्यासाठी तिनं पैसेही घेतलेले असतात. पुढे काही महिन्यांनी परदेशी जोडपं भारतात आल्यावर ते मिमिला घेऊन हॉस्पिटलमध्य़े जातात. तिथे त्यांना जे कळतं तिथून मिमिच्या संघर्षाला सुरुवात होते.
मिमिचा संघर्ष काय तो आपण पाहावा, त्यातून काय बोध घेता आला तर घ्यावा. पालक होण्यासाठी मुलांना जन्माला घालणं महत्वाचं नाही. तसचं पालक होण्यासाठी मुलगा तुझाच हवा हेही काही महत्वाचं नाही. हे समर (इव्हेलेन एडवर्डस) तिला जेव्हा ऐकवते तेव्हा मिमिच्या डोळ्यातून पाणी येतं. हा सीन भलताच सेंटी आहे. सरोगसीच्या नावाखाली भारतातील काही जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारे बिझनेस होतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला सरोगसी काय प्रकरण आहे आणि त्याच्या मागील अर्थकारण हे दिग्दर्शक दाखवतो. सुरुवातीला एका गंभीर विषयाचा परिचय करुन देताना आपण दोन तास निव्वळ टाईमपासमध्ये कसे घालवले हे चित्रपट संपल्यावर लक्षात येते.
Esakal