मुसळधार पावसात एका चिमुकल्याला वाचवण्यासाठी अनेकांनी जीवाची बाजी लावत नदीपात्र ओलांडून त्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आलंय. ह्या चिमुकल्या बाळाला खांद्यावर घेऊन सुरक्षितरित्या बाहेर काढले जात असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला आहे.यापैकी जितकरवाडी लगतचा डोंगर घसरून दरडी कोसळू लागल्याने दोनच दिवसांपूर्वी तेथील २३ कुटुंबांतील ९३ जणांना सुरक्षेच्या कारणास्तव जिंती येथील विद्यालयात हलविण्यात आले आहे.

ढेबेवाडी (सातारा) : राज्यभर कोसळल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर काहींना आपला संसार उघड्यावर थाटण्याची वेळी आलीय. साताऱ्यात तर या पावसात तब्बल 40 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर असंख्य कुटुंबांना स्थलांतर करावे लागलेय. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, धनावडेवाडी या गावात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असून गावाचा नामो निशान मिटला आहे.
या अशा मुसळधार पावसात एका चिमुकल्याला वाचवण्यासाठी अनेकांनी जीवाची बाजी लावत नदीपात्र ओलांडून त्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आलंय. ह्या चिमुकल्या बाळाला खांद्यावर घेऊन सुरक्षितरित्या बाहेर काढले जात असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झालू असून अनेकांनी त्या फोटोवर कमेंट देत त्या बाळाला जीवदान देणाऱ्यांचे आभार मानलेत. याबाबतची फोटोसह बातमी ‘सकाळ’ने प्रसिध्द केली होती.
अधूनमधून कोसळणाऱ्या (Patan Taluka Landslide) दरडी, रुंदावत चाललेल्या डोंगराच्या भेगा, घरात फुटलेले पाण्याचे उमाळे, वाढतच निघालेले भिंतींचे तडे… अशा बिकट परिस्थितीत पूल तुटून दळणवळणही ठप्प झाले होते.
जिवाच्या काळजीने चार दिवस प्रचंड भीतीखाली असलेली दुर्गम धनावडेवाडी व शिंदेवाडी (ता. पाटण) येथील ३२ कुटुंबे पावसाची थोडी उघडीप मिळताच गाव सोडून ढेबेवाडीत (Heavy Rain In Dhebewadi) आश्रयाला आली.
पोलिस व महसूल प्रशासनाने भरून वाहणाऱ्या वांग नदीच्या पात्रात मानवी साखळी तयार करून त्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मराठवाडी धरणाच्या (Marathwadi Dam) जलाशयापासूनच लगतच डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, शिंदेवाडी, धनावडेवाडी या छोट्याशा वाड्या वसलेल्या आहेत.
यापैकी जितकरवाडी लगतचा डोंगर घसरून दरडी कोसळू लागल्याने दोनच दिवसांपूर्वी तेथील २३ कुटुंबांतील ९३ जणांना सुरक्षेच्या कारणास्तव जिंती येथील विद्यालयात हलविण्यात आले आहे.
जितकरवाडी जवळच ओढ्यापलीकडे असलेल्या निगडे ग्रामपंचायतीच्या कक्षेतील धनावडेवाडी व शिंदेवाडी परिसरातही डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
गावाबाहेर पडण्याचे बंद झालेले मार्ग, खंडित वीजपुरवठा, नॉट रिचेबल मोबाईल आणि घरात लागलेले पाण्याचे उमाळे अशा कठीण परिस्थितीत संपर्कहीन झालेल्या धनावडेवाडीकरांनी पावसाची उघडीप मिळताच गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
पोलिस व महसूल प्रशासनाच्या मदतीने तुटलेल्या पुलाला शिड्या लावून आणि छाती एवढ्या पाण्यात मानवी साखळी तयार करून नदी ओलांडली.
सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह तलाठी डी. डी. डोंगरे, ग्रामसेवक थोरात, दीपक सुर्वे, पोलिस कर्मचारी नवनाथ कुंभार, कपिल आगलावे, गणेश शेळके, होमगार्ड आशिष पुजारी, संग्राम देशमुख, स्वप्नील पानवळ, शुभम कचरे, विशाल मोरे यांच्या टीमने नदीपात्रात उतरून नागरिकांना सुरक्षितपणे काठावर आणले.
स्थानिक नागरिक, युवक कार्यकर्ते व काही शिक्षकांनीही मोठी मदत केली. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे युवा नेते यशराज देसाई यांनी जीवनावश्यक साहित्याचे किट, ब्लॅंकेट अशी मदत स्थलांतरित कुटुंबांसाठी सुपूर्द केली.
जिंतीतून वाहनांची व्यवस्था करून नागरिकांना ढेबेवाडीत आणले. येथील साई मंगलम कार्यालयात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, कार्यालय मालक चंद्रकांत ढेब, उदय साळुंखे, महेश विगावे, विनोद मगर यांनी कार्यालयासह तेथील सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here