गेल्या आठवड्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह इतर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं. काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर कुठे नदीने पात्र सोडून हाहा:कार माजवला. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर कुणाच्या घरावरील छप्पर नाहिसं झालं. या नैसर्गिक आपत्तीमधून प. महाराष्ट्र आणि कोकणातील लोक सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यभरातून त्यांना मदतीचा हातही दिला जातोय. मात्र, या पूरस्थितीमध्ये राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. प. महाराष्ट्र आणि कोकण जायबंदी झाले आहे. या दोन्ही विभागाला पूर्वपदावर येण्यासाठी कित्येकवर्ष लागतील. 2019 मध्ये आलेल्या पूरातून सावरत असतानाच 2021 मध्ये पुन्हा एकदा आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला अन् होत्याचं नव्हतं करुन गेला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 209 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 400 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील वर्षभरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाची राज्याने केंद्राकडे जवळपास 3,700 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागतली. मात्र, केंद्र सरकारने राज्याला या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी 700 कोटी रुपयांची मदत केली होती. यंदा आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील सरकारी मालमत्तेचं जवळपास 4000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर 209 जणांना जीव गमवावा लागला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार आज मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आज, बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कोकण आणि प. महाराष्ट्रला विशेष पॅकेज दिलं जाऊ शकतं. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवर ठाकरे सरकारकडून ही मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
Also Read: पुरग्रस्तांसाठी शरद पवार यांची मोठी घोषणा

Also Read: ‘मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांसोबत नुकसान भरपाईच्या पॅकेजबद्दल चर्चा केली आहे. बुधवारी याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. व्यापारी आणि दुकानदारांसह छोट्य-मोठ्या उद्योगवाल्यांनाही सरकारकडून मदत मिळू शकते. पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मृताची संख्या मंगळवारी 209 वर पोहचली आहे. मागील आठवड्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणामध्ये 150 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4.3 लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेडला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या 20 हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यात चिपळूणमध्ये 18 हजार 278 दुकानें, घरे, टपऱ्या यांचा समावेश आहे. पूर, दरडी कोसळल्यामुळे 35 जणांचा बळी गेला आहे. कोल्हापूर, रायगड, सांगली आणि साताऱ्यांमध्येही मोठं नुकसान झाले आहे.
Also Read: ठाकरे सरकारची बदनामी; एसटी कर्मचारी निलंबित

Esakal