अनेकांना चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन करायला नेहमीच आवडतं. जगभरातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थाची चवच न्यारी आहे, त्यातूनच आपली खाद्यसंस्कृती देखील समजते. मग, चला तर पाहुयात सोलापूरातील काही खास पदार्थांबद्दल…

चादर आणि टॉवेल म्हटले की ती सोलापुरचीच! तसेच भाकरी नि शेंगाचटणी म्हटले की ती सोलापुरचीच असेच बोलले जाते. सोलापुरी शेंगाचटणी आणि ज्वारी, बाजरीच्या कडक भाकरींचा आस्वाद घेण्यासाठी अनेक देशीविदेशी पाहुणे नेहमीच आसुसलेले असतात.

पूर्वभागातील तेलुगु भाषिकांचे प्रमुख अन्न भात. त्याच्यासोबत चारू नसेल तरच नवल. हा चारू इतका लोकप्रिय झाला की, बाहेरून येणारी मंडळी पूर्वभागातील चारू आवर्जून मागतात. चारू म्हणजे आमटी.

महाराष्ट्र – कर्नाटक – सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः सोलापुरात या हुग्गीला एक महत्त्वाचं स्थान आहे. लिंगायतांच्या घरांमधली लग्नं हुग्गीशिवाय पूर्ण होत नाहीत.

हुरड्याच्या एका घासासोबत चटणीची चिमूट तोंडात टाकली की येणारी मजा काय सांगावी? सोबत गावरान बोरांची लज्जतही न्यारीच. तोडून आणलेले ज्वारीचं कणीस, चुलीत ते भाजायचं. नंतर हातावर चोळायचं अन् फुंकर मारत लुसलुशीत हुरड्यावर ताव मारायचा. सोलापूर आणि परिसरात अशा पार्ट्या जानेवारीपासून सुरू होतात. सकाळच्या हुरड्याप्रमाणंच दुपारचं चुलीवरचं कांदा-भाकरीचं जेवणही तितकच स्वादिष्ट लागतं. नंतर शेतात फेरफटका अन् घरी परत जाताना डहाळी, ऊसही खुणावतात.

सोलापूरच्या स्टॉलवर मटण शिक कबाब नावाचा भन्नाट प्रकार बनवला जातो. ज्वारी-बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत मटणाचं लोणचं आणि शिगेवर खरपूस भाजलेलं मटण. हे लोणचं महिनाभर टिकतं. जेव्हा हवं तेव्हा गरम करावं आणि भाकरीसोबत खावं.

शेंगदाणा चटणी हे तर सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. शेंगदाणे भाजून किंवा न भाजता, त्याची जाडीभरडी किंवा साधारण बारीक पूड करून त्यात तिखट, मिठ, जिरेपूड, तेल व इतर मसाल्याचे पदार्थ घालून ही चटणी बनवली जाते.

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेंगा पिकतात. या शेंगदाण्यांपासून केला जाणारा भन्नाट प्रकार म्हणजे शेंगा पोळी. सोलापूरच्या पदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे किमान पदार्थ वापरून चवदार पदार्थ बनवायचे. त्याप्रमाणे भाजलेल्या शेंगा व गूळ एकत्र कुटून पोळी लाटून शेंगा पोळ्या बनवतात. यावर तूप लावून खाणे म्हणजे स्वर्गसुखच.
Esakal