ओळखीचा गैरफायदा घेऊन रात्री ८ वाजता अनिल बँकेत गेला अन्…

नालासोपारा: विरार पूर्व स्टेशन परिसरातील ICICI बँकेच्या माजी मॅनेजरने ओळखीचा गैरफायदा घेत बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या तरूणाने बँकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यातील असिस्टंट मॅनेजर योगिता वर्तक-चौधरी (34) यांचा मृत्यू झाला तर कॅशियर श्रद्धा देवरुखकर (35) या गंभीर जखमी झाल्या. आरोपी तरूण अनिल दुबे याने रात्रीच्या वेळी बँकेच्या शाखेत जाऊन धारदार शस्त्राने महिला सहकाऱ्यांवर हल्ला केला. परंतु, दुसरी महिला कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी तरूणाला रोकडीसह पकडणे शक्य झाले. मृत्यू पावलेल्या योगिता या ८ वर्षांपासून ICICI बँकेत काम करत होत्या. त्यांचे ५ वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना ३ वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पती फार्मा कंपनीत काम करतात. तर जखमी श्रद्धा देवरुखकर यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. (ICICI bank Robbery in Virar Branch 1 female died another seriously injured culprit arrested)

योगिता वर्तक चौधरी (मयत)

गुरुवारी रात्री ८च्या दरम्यान बँकेत कार्यालयीन काम सुरू असताना बँकेचा पूर्वीचा मॅनेजर अनिल दुबे (आरोपी) ओळखीचा गैरफायदा घेऊन बँकेत आला. त्याने अचानक असिस्टंट मॅनेजर असणाऱ्या योगीता यांच्यावर धारदार हत्याराने गळ्यावर, छातीवर, पाठीवर वार केले. योगिता यांचा ओरडण्याचा आवाज ऐकताच श्रद्धा यांनी तात्काळ बँकेतील आलार्म वाजवला आणि बाहेरील लोकांना जागरूक केले. त्याच वेळी आरोपीने दुसरा वार श्रद्धा यांच्यावर केला आणि त्यांनाही गंभीर जखमी केले. दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना आरोपीने लुटीचा माल गोळा करण्यास सुरूवात केली.

Also Read: मनसे-भाजपा युतीच्या जोरदार चर्चा? भाजप नेत्याचे सूचक विधान

बँकेच्या तिजोरीतील 1 कोटी 38 लाख रुपये किमतीचे सोने, रोख रक्कम असं सारं बॅगेत भरून तो फरार होत होता. आरोपी फरार होत असताना जखमी अवस्थेत असणाऱ्या श्रद्धाने पुन्हा प्रतिकार करत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण धारदार हत्याराने घायाळ झालेल्या श्रद्धा या आरोपीच्या ताकदीसमोर कमी पडल्या. त्यानंतर आरोपीने बँकेच्या बाहेर पळ काढला पण तितक्यात बँकेतील आरडाओरडा ऐकून बाजूलाच असणाऱ्या जितू खत्री, धनंजय सालीयन (50), शारुख मुस्ताक खान (27), अमित संगम मिश्रा (32) यासह अन्य तरुणांनी आपल्या प्राणाची बाजी लावून आरोपीचा पाठलाग केला. त्यामुळेच बॅगेसह आरोपीला पकडण्यात यश आले. या तरुणांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि रोख रक्कम, सोने असलेली बॅग बँक मॅनेजरसमोर पोलिसांच्या ताब्यात दिली, अशी माहिती त्या तरूणांनी सांगितले.

आरोपी अनिल दुबे अटकेत

घटनेची माहिती मिळाताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तसेच, विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, ACP रेणुका बागडे, DCP प्रशांत वागुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी आणि मृत्यू पावलेल्या महिलेला ताब्यात घेऊन त्यांना दवाखान्यात पाठविले. शुक्रवारी (30 जुलै) मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनीही घटनास्थळाची पाहणी केली आणि अधिक चौकशीचे आदेश दिले.

याबाबत विरार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात हत्या, लूट या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला आज वसई न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपीला 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत वागुंडे यांनी दिली.

Also Read: भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला; म्हणाले “धरणात…”

आरोपी तरूण रात्री बँकेत प्रवेश करताना बँकेबाहेर कोणताही सुरक्षारक्षक, गन मॅन, किंवा शिपाई नव्हता आणि याचाच फायदा घेऊन आरोपीने दोन महिला कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला असं सांगण्यात येत आहे. एवढ्या रात्रीपर्यंत बँक चालू राहत असेल तर बँकेतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक का ठेवले नाहीत? असा सवाल मयत योगिता यांचे काका दिनकर चौधरी आणि जखमी श्रद्धा यांचे आप्तेष्ट असलेले प्रदीप केळकर यांनी केला आहे. तसेच, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यांनी केला आहे.

आरोपी अनिल दुबे

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल दुबे हा पूर्वी ICICI बँकेचा माजी मॅनेजर होता. त्याची कर्मचाऱ्यांशी ओळख होती. तो कर्जबाजारी झाला होता. मिळणाऱ्या पगारात भागत नसल्याने त्याला अधिकचे काम हवे होते. त्याबद्दल बोलण्यासाठी योगिता यांनी त्याला बँकेत बोलावले होते. तो रात्रीच्या आठच्या सुमारास आला आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here