चेंबूरमधील दरड दुर्घटना, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे थैमान असो की माळीण भूस्खलन, मुंब्रा इमारत दुर्घटना, सावित्री पूल दुर्घटना, तिवरे धरणफुटी अशा कितीतरी घटनांमध्ये एनडीआरएफच्या जवानांनी आपले प्राण धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास सज्ज असणाऱ्या मुंबई एनडीआरएफचे डेप्युटी कमांडन्ट आशीष कुमार यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव…

रायगड, रत्नागिरीमध्ये पुराने थैमान घातले होते. अनेक भागांत पाणीच पाणी साचले होते. रस्ते, पूल वाहून गेले होते. ठिकठिकाणी लोकं अडकून पडली होती. रस्ते बंद असल्यामुळे आम्ही नेव्हीच्या चॉपरमधून जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतून २२ जणांची टीम चॉपरमधून रायगडकडे रवाना झाली. काही वेळातच रायगड गाठले, मात्र चॉपर उतरायला तिथे जागाच नव्हती. पाण्याचा अंदाज येणे कठीण होते. सर्वत्र पाणी आणि चिखल झाला होता. शेवटी चॉपर हवेत घिरट्या घालू लागले. चार वेळा घिरट्या घालून सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न पायलटने केला, मात्र अपयश आले. डिझेल संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. बाका प्रसंग होता, शेवटी पायलटने रत्नागिरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीत उतरल्यानंतर, मिळेल त्या वाहनाने, कधी चालत आम्ही रायगडकडे निघालो. तोपर्यंत दुसरी तुकडी चालत रायगडमध्ये दाखल झाली होती आणि बचावकार्य सुरू झाले. अशा वेळी आम्हाला अडचणी, समस्या दिसत नाहीत, दिसतो फक्त माणसाचा जीव. त्याला वाचवायचे हेच असते लक्ष्य.

एनडीआरएफ जवानांसाठी हे नेहमीचे काम आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात एनडीआरएफचे कार्यालय आहे. या ठिकाणी तीन तुकड्या तैनात असतात. मुंबईत कुठली आपत्ती येईल, हे सांगता येत नाही. मात्र एनडीआरएफच्या तुकड्या कायम अशा घटनेसाठी सज्ज असतात.

सप्टेंबर २०२०… पहाटेचे चार वाजले होते. एनडीआरएफ कंट्रोल रूमला इमर्जन्सी कॉल आला. भिवंडीत कोसळलेल्या इमारतीसंदर्भात. आमची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. इमारतीचे तीन मजले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले होते. आम्ही रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. इमारत कोसळून २० ते २५ फुटांचा ढिगारा तयार झाला होता. मलबा हटवत ढिगाऱ्याच्या आत जाण्याचा प्रयत्न आमचे जवान करत होते. दुसरा दिवस उजाडला. ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत असेल, असे वाटत नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही एक्युपमेंट डिटेक्टींग कॅमेरा वापरला. मशीनने सिग्नल दिला. मात्र ढिगाऱ्याखालून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. रेस्क्यू ऑपरेशन थांबवायला आमचं मन तयार होत नव्हतं. आम्ही नव्याने प्रयत्न सुरू केले. ढिगाऱ्यात १२ ते १३ फूट खाली इमारतीचा २०० टन वजनी स्लॅब होता. त्याखाली काही लोक गाडले गेले होते. रिस्क होती. जर स्लॅब कोसळला तर त्याखाली आम्ही चिरडण्याचा धोका होता. धोका पत्करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मोठ्या ड्रिल मशीनने स्लॅबच्या आरपार खाली जाणे शक्य होईल तेवढा होल केला. त्यातून टॉर्च मारून काही प्रतिसाद मिळतो का पाहिलं. पण व्यर्थच… शेवटी त्या होलमध्ये सळई आत घालून त्याने आवाज केला. तेवढ्यात आम्हाला प्रतिसाद मिळाला. यानंतर ढिगाऱ्याखाली कुणीतरी जिवंत असल्याची पक्की खात्री झाली. रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू झालं. ढिगाऱ्याखाली १५ फूट आत शिरलो. तब्बल १५ तासांच्या प्रयत्नाने खलील खान नावाच्या ४० वर्षीय तरुणाला आम्ही जिवंत बाहेर काढले.

खलीलने आम्हाला मिठी मारली. पायाला स्पर्श करत तो धाय मोकलून रडू लागला. ‘‘साहब, मैने अल्लाह को नही देखा, लेकीन आप ही मेरे लिये अल्लाह हो’’ असे म्हणत तो आमच्यासोबत इतरांना वाचवायच्या कामाला लागला. त्याने शेजारच्या घरातील चार व्यक्तींपैकी एकजण जिवंत असल्याचे सांगितले. त्यांनाही जिवंत बाहेर काढलं. हा प्रसंग अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही.

या घटनेत आम्ही २५ लोकांना जिवंत बाहेर काढले. ४१ लोकांचा यात दुर्दैवी अंत झाला.

२०१२ मध्ये एनडीआरएफ मुंबईच्या तुकडीत दाखल झालो. त्यापूर्वी मी लष्करात कार्यरत होतो. उत्तर प्रदेशातील वाराणसी इथे माझे घर आहे. मी यापूर्वी देशभरात आपत्ती निवारणात काम केलं. २०११ मध्ये जपानमध्ये आलेली त्सुनामी २०११, २०१५ मधील नेपाळ भूकंप या घटनेत बचावकार्यात मी सहभागी होतो. वर्षातून आम्हाला दोन वेळा काही दिवसांच्या सुट्ट्या मिळतात. मात्र आजपर्यंत सलग दोनदा सुट्या घेणे शक्य झाले नाही. गेल्या २५ वर्षांपासून मला वाराणसीत जाता आले नाही. त्याचे दु:ख वाटते.

एनडीआरएफसाठी पॅरा मिलिटरी फोर्समधील जवानांची निवड केली जाते. त्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या देशभरात एनडीआरएफच्या १६ बटालीयन काम करतात. एका बटालियनमध्ये सुमारे १,१४९ अधिकारी आणि जवान कार्यरत असतात. प्रत्येक बटालीयनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत ४५ जवान असतात. यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वॉड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात. दुर्घटना झाल्यास, अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित असते. दुर्घटना नेमकी कोणत्या प्रकारची आहे, याबाबत माहिती घ्यावी लागते. यासाठी घेण्यात आलेले प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते.

२०१९ मध्ये सांगली-कोल्हापूरमध्ये पुराने थैमान घातले होते. आमचे रेस्क्यू ऑपरेशन खूप दिवस सुरू होते. एनडीआरएफ म्हणजे सुरक्षा अशी भावना लोकांच्या मनात तयार झाली आहे. आमच्यासाठी लोकं स्थानिक प्रशासनाशी भांडत होती. आमचे बचाव कार्य संपले, रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि स्वातंत्र्यदिन जवळ आले होते. एक वेगळाच अनुभव यावेळी आम्हाला आला. कोल्हापुरातील १०० महिलांनी आम्हाला भाऊ मानून ओवाळलं, राखी बांधली. आमच्यासाठी हा क्षण अत्यंत भावनात्मक आणि कधीही न विसरण्यासारखा होता. गणेशोत्सवात दहा ठिकाणी एनडीआरएफचा गणवेश परिधान केलेली श्रीगणेश मूर्ती साकारण्यात आली. मोठा बहुमान होता. लोकं आम्हाला देवाचं रूप समजतात. स्वातंत्र्यदिनी २० ठिकाणी आमच्या हातून तिरंगा फडकवण्यात आला. लोकांनी आम्हाला सॅल्यूट केला. पेढे-मिठाई वाटली. अशा मान-सन्मानामुळे खूपच ‘प्राऊड’ वाटले. पण आम्ही अशा गोष्टींमध्ये फारसे गुंतून राहत नाही, कारण जीव वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे.

एनडीआरएफचे मुंबई युनिट २०१३ मध्ये सुरू झाले. मुंबईसारख्या दाटीवाटीने लोकसंख्या असलेल्या शहरात अशा टीमची नितांत आवश्यकता होती. इथे पूर, भूस्खल, इमारत कोसळणे, झाड कोसळणे अशा अनेक आपत्कालीन घटना होत असतात. त्यामुळे आमची टिम २४ तास कुठल्याही घटनेसाठी तयार असते.

गेल्या आठवड्यात चेंबूर येथील काही घरांवर दरड कोसळण्याची घटना ही भयावह होती. २५ लोक अडकले होते. काही लोकं आधीच निघाली होती. मात्र या भागात बचाव कार्य करणे आव्हात्मक होते. निमुळते रस्ते, चिंचोळ्या गल्ल्या आम्हाला एक किमी चालत जावे लागले. पावसाचा जोर वाढला, कोसळलेली दरड पाण्याच्या प्रवाहासोबत खाली घसरून इतर घरांवर येत होती. त्यामुळे आमच्या जीवाला धोका होता. आम्ही उपसलेला चिखल, माती आणि राडारोडा टाकण्यासाठीदेखील जागा नव्हती. त्यामुळे मानवी साखळी करून काढलेली माती एक किलोमीटर बाहेर टाकावी लागत होती. दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन करून आम्ही लोकांचा जीव वाचवला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा लोकांना वाचवण्यात यश आले.

काही दुर्घटनांमधील बचाव कार्य अडचणीचे नसते, मात्र भीतीमुळे ते कठीण होऊन बसते. गेल्या वर्षी कफ परेड भागात भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला होता. लिफ्टच्या आसपास काही लोकं अडकली होती. या जागेतून त्यांची सुटका करणे सोपे नव्हते. त्यासाठी लिफ्टचे लोखंडी गज कापावे लागणार होते. मात्र हे गज कापले तर इमारतीचा काही भाग कोसळून त्याखाली ती लोक दबण्याची शक्यता होती. त्यांना आम्ही वरच्या माळ्यावर यायला सांगितले. मात्र ते घाबरलेले होते, तिथून हटत नव्हते. शेवटी अर्धा तास खर्ची घालून आम्ही त्यांना समजावलं आणि त्यांची सुखरूप सुटका झाली.

मात्र एनडीआरएफचं काम केवळ दुर्घटनेतून लोकांना वाचवणं इतकंच नाही, तर लोकांना एखाद्या आपत्तीप्रसंगी लढण्याचे प्रशिक्षणदेखील दिलं जातं. जनजागृतीसह आपत्कालीन परिस्थितीत कोणती दक्षता घ्यावी, याची माहिती दिली जाते. यासाठी त्यांना राज्य तसंच स्थानिक आपत्ती निवारण संस्थांसोबत समन्वय राखून त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट-गाईड, एनसीसी आणि सामान्य नागरिकांनाही प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी शाळा-महाविद्यालयात १५ दिवसांचे शिबिर आम्ही घेतो. त्यातून अशा आपत्कालीन परिस्थितीत लढण्यासाठी समाजमन साक्षर होईल, अशी अपेक्षा आहे.

सप्टेंबर २०२०… भिवंडीत इमारतीचे तीन मजले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले होते. २० ते २५ फूट ढिगाऱ्याच्या आत जाण्याचा प्रयत्न आमचे जवान करत होते. दुसरा दिवस उजाडला. शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही एक्युपमेंट डिटेक्टींग कॅमेरा वापरला. ढिगाऱ्यात १२ ते १३ फूट खाली इमारतीचा २०० टन वजनी स्लॅब होता. मोठ्या ड्रिल मशीनने स्लॅबच्या आरपार खाली जाणे शक्य होईल तेवढा होल केला. त्या होलमध्ये सळई आत घालून आवाज केला. प्रतिसाद मिळाला. ढिगाऱ्याखाली कुणीतरी जिवंत असल्याची पक्की खात्री झाली. रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू झालं….

– आशीष कुमार

(लेखक मुंबईतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना (एनडीआरएफ)चे डेप्युटी कमांडन्ट आहेत.)

शब्दांकन : मिलिंद तांबे

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here