‘Your holiday is our every day,’ असं एक वाक्य प्रचलित आहे. म्हणजे नेमकं काय? आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपण एखाद्याच्या घरी जात आहोत आणि आपण तिथे फिरताना आदरपूर्वक आणि कृतज्ञतेने वागलो पाहिजे. मी नेहमी प्रवाशांना हेच सांगतो की आपण जिथे जातो तिथे स्वत:ला खऱ्या अर्थाने एकरूप होऊन सर्वसमावेशकपणे वागले पाहिजे. आपली काही दिवसांची सुट्टी असते, आपला तो प्रवास असतो, आपली ती गंमत अन् मजा असते. परंतु त्या

पर्यटनस्थळी स्थानिकांसाठी तो दिवस म्हणजे एक नित्यक्रम असतो याचं भान आपल्याला जगभरात कुठेही गेलो तरी असलं पाहिजे. प्रवास करताना आपण नम्र अन् सभ्य वागल्यास आपली ‘मैत्री’ निश्चितपणे कोणाशीही होऊ शकते. आणि जर का कोणाशी मैत्री झाली तर मग काय… प्रवास भन्नाटच होणार बघा…!

मित्रांनो, आज जागतिक मैत्री दिवस. तुम्हा सर्वांना त्यानिमित्ताने खूप साऱ्या सदिच्छा ! आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे आपले मित्र-मैत्रिणी. खरं तर आयुष्यात चांगले ‘co-travellers’ म्हणजेच सहप्रवासी असणे गरजेचे असते. आपल्याला जे आतून बाहेरुन ओळखतात आणि आपण ही त्यांना तसेच ओळखतो अशा मित्र मैत्रिणींसोबत जगात कुठेही प्रवास करता आला तर मग काही विचारुच नका !

मैत्री दिवसाचे निमित्त होते म्हणून मी विचार करत होतो की सर्वांत जास्त मैत्रीपूर्ण नागरिक कुठल्या देशात आहेत? तर त्याचे उत्तर म्हणजे पोर्तुगाल हा देश. ‘World’s Friendliest Countries’च्या गेल्या काही वर्षांच्या अनेक सर्वेक्षणातून पोर्तुगालचे नाव प्रथम क्रमांकावर आहे असे दिसून येते. त्यानंतर तैवान, मेक्सिको, कंबोडिया, बहरैन, कॉस्टारिका, ओमान, कोलंबिया, व्हिएतनाम आणि कॅनडा असे दहा देश हे अतिशय मैत्रीपूर्ण देश आहेत.

पोर्तुगालचे स्थानिक लोकं फार मैत्रीपूर्ण व मदत करणारे आहेत. तसेच तेथील लोकं एकमेकांची काळजी घेतात. दक्षिण युरोपातील पोर्तुगालची लोकसंख्या एक करोडच्या आसपास असून राजधानी लिस्बन आहे. तेथील प्रमुख भाषा पोर्तुगीज आहे. १६ व १७ व्या शतकात पोर्तुगीजांनी त्यांचे नेव्हिगेशनल कौशल्य (Navigational Skills) वापरुन जगभर पसरले. दक्षिण अमेरिकेपासून ते पूर्वेकडे कूच तर केलीच व सोबत आफ्रिकेची अन् भारताच्या किनारपट्टीवरही काही ठिकाणी त्यांचे बस्तान मांडले. त्याकाळी जगातले सर्वात मोठे व्यावसायिक आणि सागरी साम्राज्य पोर्तुगालने सक्षमपणे उभारले होते. मला वाटतं १६ व्या शतकापासून व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगालने अनेक देशांमध्ये स्वत:च्या वसाहती निर्माण केल्या.

आज तोच पोर्तुगाल देश स्वत:च्या भूभागात जगातील सर्व पर्यटकांचे अगत्याने स्वागत करतो. आपण जर तिथे कधी गेलात आणि सहज स्मितहास्य देत ‘Bom dia’ (नमस्कार) म्हणालात तर तेथील नागरिक अनौपचारिकपणे तुमच्याशी बोलतील. मार्च ते सप्टेंबर महिना तिथे भटकंती करण्यास उत्तम मानले जातात. जुलै व ऑगस्ट तर समुद्र किनारपट्टीचा आनंद घेण्यास खूप चांगले समजले जातात. लिस्बन येथील नाईट-लाईफ एकदम भारी असते त्यामुळे हे शहर तरुणांसाठी आवडीचं मानलं जातं. १४९८ मध्ये वास्को द गामा या नाविकाने भारताला जाणारा समुद्र मार्ग शोधला आणि त्याचा गौरव करण्यासाठी पहिला राजा मॅन्युअल याने मॉस्टेरो डॉस जेरोनिमोस (Mosteiro dos Jeronimos) हे सुप्रसिद्ध चर्च बांधले. लिस्बनला येणारा प्रत्येक पर्यटक हे पाहण्यास जातोच.

तसेच ओशिआनोरियो डी लिस्बोआ (Oceanario de Lisboa) हे मत्स्यालय, पालासिओ नॅशिओनल डी सिंट्रा (Palacio Nacional de Sintra) हे संग्रहालय आणि टोरे डी बेलेम (Torre de Belem) हे ‘Age of Discovery’चे प्रतिक लिस्बन येथे पाहण्यासारखे आहे. याच शहरात विविध ठिकाणी कायाकिंग या वॉटरस्पोर्टचा मनमुराद आनंद घेता येतो. सुंदर, नीटनेटके व ऐतिहासिक असणारे पोर्टो (Porto) हे शहर लिस्बननंतर सर्वात मोठे आहे. इव्हॉरा (Evora) येथील रोमन मंदिर व आजूबाजूच्या ऐतिहासिक भिंतीना जागतिक वारसा ठिकाणाचा दर्जा आहे. कोइंब्रा विद्यापीठ (University of Coimbra) हे उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम मानले जाते. या ५०० वर्षे जुन्या विद्यापीठाला ‘Cambridge of Portugal’ असं ही म्हटलं जातं. पोर्तुगालचे भव्य धार्मिक मंदिर बोम जिझस डो मॉन्टे (Bom Jesus do Monte) हे ब्रागापासून (Braga) सहा किलोमीटर पूर्वेकडे जंगलाच्या उतारावर आहे आणि देशातील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

पोर्तुगालच्या प्रत्येक मोठ्या शहरातील आर्किटेक्चर सुंदर व सुबक आहे. सोग्रापे बार्सा वेल्हा विन्हो (Sogrape’s Barca Velha Vinho) ही वाईन प्रसिद्ध आहे. देशातील काही भागात वॉटरस्पोर्ट्स, हायकिंग, सर्फिंग, सायकलिंग, राफ्टिंग, सेलिंग, असे इत्यादी साहसी पर्यटन देखील करता येतं. निसर्ग जपण्याचा तिथे सतत प्रयत्न केला जातो. तसेच फोटोग्राफर्ससाठी पोर्तुगालचे लॅंडस्केप कॅमेराबद्ध करण्यासाठी खूप वाव आहे. पोर्तुगाल हा फुटबॉल प्रेमींचा देश आहे यात तीळमात्र शंका नाही. ‘Porto works, Coimbra studies, Braga prays and Lisbon plays,’ अशी शहरांची वर्णन करणारी तिथे एक जुनी म्हण आहे.

थोडक्यात काय तर या मैत्रीपूर्ण देशात तुम्ही जायलाच पाहिजे. पोर्तुगालमध्ये न्यूनगंड न बाळगता आपण सहज सोप्या पद्धतीने स्थानिकांशी संवाद करू शकतो. प्रवासातून संवाद होतो, संवादातून मैत्री होते आणि मैत्रीमुळे आयुष्य अधिक समृद्ध होते. निश्चिंत होऊन निवांत फिरायला व निखळ मैत्रीसाठी पोर्तुगाल येथे गेलंच पाहिजे…!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here