पिंपरी : ‘‘होमगार्ड (Homeguard) म्हणून २००८ पासून काम करतोय. परंतु, महिन्याचे पूर्ण दिवस ड्यूटी मिळत नाही, त्यातही जेवढे दिवस भरले, त्याचेही मानधन तीन-तीन महिने मिळत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी दुसरीकडे रात्रपाळीचे काम करण्यासह उर्वरित वेळेत रिक्षाही चालवीत आहे. आर्थिक घडी बसविण्यासाठी दुसरीकडे काम करताना एखाद्या दिवशी होमगार्डची (Homeguard) ड्यूटी हुकल्यास तेथील यादीतून नाव कमी होण्याची टांगती तलवार कायम असते. पगार वेळेत न झाल्यास अक्षरशः उपासमारीची वेळ येते. अशा परिस्थितीत पोलिसांच्या (Police) खांद्याला खांदा लावून बारा-बारा तास ड्यूटी करूनही नशिबी फरफटच येतेय,’’ अशी चिंचवडमधील या एका होमगार्डसारखीच अवस्था इतरांचीही आहे. (Pimpri Chichwad Police Homeguards No Duty No Payment)
होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाची ६ डिसेंबर १९४६ रोजी स्थापना झाली. पोलिसांसह अग्निशमन दलाला मदत, वाहतूक नियंत्रण, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, दंगलग्रस्त परिस्थितीचे नियंत्रण आदी महत्त्वाची कामे करतात. राज्यात सुमारे ५५ हजार होमगार्ड आहेत, तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सध्या तीनशे होमगार्ड आहेत. दिवसाला त्यांना प्रवास भत्ता, जेवण भत्ता, धुलाई भत्ता यासह ६७० रुपये मानधन दिले जाते. मात्र, त्यातही त्यांना महिन्याला पूर्ण दिवस ड्यूटी मिळत नाही. सण, उत्सव, निवडणूक, नाकाबंदी अथवा परीक्षेदरम्यान बंदोबस्त असतो. मात्र, इतर दिवशी बंदोबस्त न मिळाल्याने घरीच बसावे लागते. ड्यूटी केलेल्या दिवसाचे मानधन मिळण्यासाठी महिनोमहिने वाट पहावी लागते.
Also Read: कौटुंबिक हिंसाचाराचे ‘पुढचे पाऊल’!
दरम्यान, संसाराचा गाडा चालविण्यासाठी काही जण होमगार्डची ड्यूटी करून इतर ठिकाणी सुरक्षारक्षकासह इतर कामे करतात. इतर ठिकाणी काम करताना होमगार्डच्या ड्यूटीसाठी उपस्थित राहणे शक्य न झाल्यास नंतर होमगार्डच्या ड्यूटीमधूनही नाव वगळले जाते. अशी दुहेरी कसरत होमगार्डना करावी लागत आहे. चार महिने ड्यूटी केल्यानंतर दोन महिन्यांचे मानधन मिळाले असून, अद्यापही अनेकांचे दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही होमगार्डच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते.
Also Read: पुणे : कोरोना रुग्णांसाठी ८१ हजार खाटा
उद्याचे काय?
ड्यूटी असेल त्याच दिवसाचे मानधन मिळते. मात्र, वर्षातील काही ठराविक दिवशीच सलग ड्यूटी मिळते. इतर दिवशी घरीच बसावे लागते. त्यामुळे एक दिवस ड्यूटी केल्यानंतर दुसऱ्या दिवसाचे काय? याची चिंता सतत सतावत असते, असे चिखलीतील गृहरक्षक दलाचे जवान सांगत होते.
या आहेत मागण्या…
-
वार्षिक ३६५ दिवस कामावर रुजू करावे.
-
वेळेवर मासिक वेतन द्यावे.
-
आरोग्याची जबाबदारी घ्यावी.
-
सातव्या वेतन आयोगानुसार भत्त्यामध्ये वाढ करावी.
-
पोलिस दलातील भरतीसाठीचे आरक्षण पाच टक्क्यांवरून पंधरा टक्के करावे, केंद्रीय दलाप्रमाणे सुविधा द्याव्यात.
-
तीन वर्षांनी होणारी पुनर्नोंदणी पद्धत बंद करावी.
-
बंदोबस्त मानधन आठवडाभरात द्यावे.
पोलिसांसह इतर यंत्रणेसोबतही प्रत्येकवेळी होमगार्ड ड्यूटीवर उभा असतो. वेळप्रसंगी जिवाची बाजी लावतो, त्यामुळे पोलिसांप्रमाणे होमगार्डनाही सर्व सुविधा मिळाव्यात. ३६५ दिवस ड्यूटी मिळण्यासह पगारही वेळेत व्हावेत.
-रवींद्र, होमगार्ड
Esakal