ठाणे : दोन दिवसांपूर्वी जागतिक व्याघ्रदिन (World Tiger Day) साजरा झाला आणि ठाणेकरांना (Thane) आठवण झाली ती बिट्टू बॉसची. ४ डिसेंबर २०१९ रोजी येऊरच्या जंगलात मॉर्निंग वॉक करत असताना काही जणांना बिबट्याच्या (Leopard) बछड्याचे दर्शन झाले. आईशी ताटातूट झाल्याने ते इवलेसे बछडे घाबरलेले होते. वन विभागाने ते ताब्यात घेऊन त्याचे पुनर्वसन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लेपर्ड रेस्क्यू सेलमध्ये केले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याचे पालकत्व घेत बिट्टू बॉस म्हणून त्याचे नामकरणही केले. तेव्हापासून तो येथेच असून आता मोठा झालेल्या या बिट्टू बॉसचा रुबाबही वाढला आहे. (Sanjay Gandhi National Park Bittu Leopard Big)

ठाणे शहराला लागूनच असलेल्या येऊरच्या जंगल परिसरात बिबट्याची कायमच दहशत असते, पण दोन वर्षांपूर्वी येऊरच्या जंगल परिसरात सापडलेल्या त्या बिबट्याच्या बछड्याने ठाणेकरांनाही लळा लावला होता. आईच्या शोधात ते बछडे एका झुडपामध्ये ‘इवलीशी’ डरकाळी मारत होते. बिबट्याच्या भीतीने अनेकांनी तेथून पळ काढला; मात्र काही ‘हौशी’ ठाणेकरांनी जवळ जाऊन पाहण्याची हिंमत केली आणि बिबट्या नव्हे, तर बिबट्याचे ‘गोंडस’ बछडे असल्याचे निदर्शनास आले. बहुतेक आईशी ताटातूट झालेले ते बछडे असावे, पुन्हा त्याची आई येईल या आशेवर वन विभाग होता, पण त्याची आई आलीच नाही. अखेर वन विभागाने ते बछडे ताब्यात घेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याची रवानगी केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्या वेळी इतर अनेक बिबटे होते आणि आजही १२ बिबटे आहेत; मात्र संपूर्ण उद्यानात बिट्टू बॉस ठरला आहे.

दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या १२ बिबटे आहेत. प्रत्येकासाठी स्वतंत्र पिंजरे आहेत. नाईट शेल्टर आकाराने लहान पिंजरेही आहेत. तेथे या बिबट्यांना रात्री आरामासाठी ठेवण्यात येते. सकाळ होताच त्यांची रवानगी २० बाय २० मीटरच्या मोठ्या पिंजऱ्यात होते. येथे लाकडाच्या ओंडक्यांपासून ते नखे घासण्यासाठी विशेष व्यवस्था आहे.

बडदास्त ठेवण्यासाठी १० ते १२ कर्मचारी

बिट्टू संजय गांधी उद्यानात आला तेव्हा तो अवघ्या महिनाभराचा, एखाद्या मांजरीएवढा होता. वजन ३०० ग्रॅम होते. आईच्या दुधाची आबाळ होऊ नये म्हणून त्याच्यासाठी खास अमेरिकेतून दूध पावडर येऊ लागली. आता रोज अडीच किलो म्हशीचे मांस तो एका फटक्यात फस्त करतोय. त्यामुळे त्याचे वजनही ३० किलो झाले असून प्रकृती उत्तम असल्याचे वन्यजीव सहायक आयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. बछडा असल्यापासून ते आतापर्यंत डॉ. पेठे बिट्टूची नियमित काळजी घेत आहेत. याशिवाय येथील अधिकारी विजय बरबडे यांच्यासह १० ते १२ कर्मचारी त्याची रोज बडदास्त ठेवत आहेत.

Also Read: मिठीच्या पुरावर २०२२ला उतारा

दर्शनासाठी सफारीय

बिट्टूला आता जंगलात सोडले तर मोठे प्राणी त्याला जगू देणार नाहीत. म्हणून त्याचा कायमचा मुक्काम बहुतेक संजय गांधी उद्यानातच राहणार असून भविष्यात त्याला पाहण्याची इच्छा असलेल्यांसाठी ‘सफारी’चीही व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे वन्यजीव सहायक आयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here