कऱ्हाड (सातारा): आयुष्याची पुंजी खर्च करून काडीकाडी जमा करत उभारलेले कुडामेडाचे घर, कर्ज काढून त्याची केलेली डागडुजी, काहींची वडिलार्जित घरे पुराच्या, भूस्खलनाच्या फटक्यात मोडून पडली आहेत.
पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी, कऱ्हाड, सातारा तालुक्यांतील एक हजार ३२० कच्ची-पक्की घरे मोडली आहेत. पूर व भूस्खलनात जी घरे शाबूत आहेत ती राहण्यायोग्य आहेत की नाही याचीही शंका आहे. त्यामुळे अनेकांच्या घराकडे जाण्यासाठी अंगावर काटा येत आहे, अशी स्थिती आहे.आतापर्यंतच्या पंचनाम्यातून हे वास्तव समोर आले असून, भूस्खलन, पुराच्या फटक्यात उद्ध्वस्त झालेले संसार उभे करण्याचे आव्हान बाधितांसमोर आहे.संबंधित घरांचा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेपूरग्रस्त गावात रोज दोन- चार घरे कोसळत आहेत.अनेक दिवस जुनी मातीची, कुडामेडाची आणि चांगली घरेही पाण्यात राहिल्याने त्या घरांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घर डोळ्यादेखत कोसळत आहेत. काही गावांत तर पत्र्यासकट छत वाहून गेले आहेत. त्यामुळे तेथील लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ते निवारा शोधत आहेत. काहींनी तर सामाजिक सभागृह, मंदिरांत आसरा घेतला आहे. ती घरे उभी करण्याचे आव्हानच संबंधित पूरग्रस्तांसमोर आहे.मुसळधारेने अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. त्या लोकांना अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहे.अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू असून, पडलेल्या घरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक जुन्या मातीच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान होत आहे, तर अनेकांची घरे कधी कोसळतील याचा नेम राहिलेला नाही. संबंधित घरांचा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तो खर्च करायचा कोठून हा प्रश्न सध्या पूरग्रस्तांसमोर आहे.