बारामती : नीरा डावा कालव्याची वहनक्षमता वाढविण्यासह त्याचे मजबूतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच सुशोभिकरणाचे काम सुरु होणार आहे. बारामती (baramati) शहरातून वाहणारा नीरा डावा कालवा येत्या काही दिवसात सौंदर्यस्थळ म्हणून विकसीत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. (Beautification Baramati Nira Dawa Canal)
सुमारे 109 वर्षांपूर्वी इंग्रजांनी नीरा डावा कालव्याची निर्मिती केली होती. वीर धरण ते शेटफळपर्यंत या कालव्याची लांबी 158 कि.मी. असून बारामती, इंदापूर तालुक्यातील मोठी जमीन या कालव्याच्या पाण्यामुळे ओलिताखाली येते. कालवा उभारताना तो मातीचा असल्याने गाळ साचून व गळतीमुळे त्याची वहनक्षमता गेल्या काही वर्षात कमालीची कमी झाली आहे, पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या उद्देशाने आता त्याची वहनक्षमता वृध्दींगत करण्यासह मजबूतीकरण प्रक्रीया आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवड्यात हे काम मार्गी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नव्या रचनेनुसार वीर धरणातून पाणी कालव्यात येताना ते सध्या 850 क्यूसेक्स वेगाने सोडले जाते, त्याचा वेग हे काम पूर्ण झाल्यावर 1250 क्यूसेक्स पर्यंत जाईल, 42 मैल अंतरावर म्हणजे माळेगावपर्यंत 480 क्युसेक्सने पाणी वाहते त्याची क्षमता 950 क्यूसेक्स पर्यंत जाईल अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली.
या कालव्यावर 18 जलसेतू (खालील बाजूस नदी किंवा ओढा व त्यावरून नीरा डावा कालवा नेण्यात आला आहे. उदा. तेरा मोरी, तीन मोरी ) असून त्या पैकी 11 जलसेतूंची क्षमता वाढवण्यात आली असून आगामी टप्प्यात उर्वरित सात जलसेतूंची क्षमता वाढणार आहे. या शिवाय जेथे मातीच्या भरावाला गळती होते आहे, तेथे दुरुस्ती करुन गळती थांबविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. जेथे दगडी मो-यांना गळती आहे तेथे लायनिंगचे काम सुरु असल्याचे धोडपकर यांनी सांगितले.
Also Read: पोलीसांच्या कामात अडथळा; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक
सहा कि.मी.चे अस्तरीकरण सुरु
बारामती शहरातील देवीच्या मंदीरापासून ते जळोची साठवण तलाव, देवीच्या मंदीरापासून ते परकाळे बंगला पूल व घारे इस्टेट साठवण तलावापासून ते अवधूतनगरपर्यंत सिमेंट कॉंक्रीटच्या अस्तरीकरणाचे काम सुरु झाले आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंचा भराव व तळाला असे पूर्ण अस्तरीकरण केले जाणार आहे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन जेव्हा बंद होते, तेव्हा हे काम सुरु आहे.
Also Read: पुणे : व्यापारी महासंघाचा अल्टिमेटम; दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा…
सुशोभिकरणही केले जाणार
नीरा डावा कालव्यालगत सुशोभिकरण केले जाणार असल्याची माहिती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी दिली. खालील बाबींचा यात समावेश असेल.
-
जॉगिंग व रनिंग ट्रँक
-
सायकलींग ट्रँक
-
सोळा ठिकाणी नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
-
लहान मुलांसाठी खेळणी बसवली जाणार
-
ज्येष्ठांसाठी वेगळी सुविधा दिली जाणार
-
योगा व प्राणायमासाठी स्पॉट विकसीत केले जाणार.
-
परकाळे पूलानजिक आर्च असलेला नवीन पूल विकसीत होणार.
Esakal