१०० कोटी वसुली प्रकरणात दिवसेंदिवस देशमुखांवरील दबाव वाढण्याची चिन्हे
मुंबई: १०० कोटींची वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या ईडीच्या (ED) रडारवर आहेत. सचिन वाझेने (Sachin Waze) आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी वसुली प्रकरणात (Extortion Case) अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. तेव्हापासून इडीने देशमुखांविरोधात विविध पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. अनिल देशमुखांना तीन वेळा समन्स (Summons) बजवाल्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना चौथ्यांदा समन्स बजावून आज हजर राहण्यास सांगितलं होतं. त्या मुद्द्यावर देशमुखांचे वकिल इंद्रपाल सिंग (Adv Indra Pal Singh) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
Also Read: अनिल देशमुख गायब असल्याच्या चर्चा रंगताच ‘तो’ VIDEO व्हायरल
अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात तीन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्या तीनही वेळी त्यांनी प्रकृतीचे कारण देत चौकशीपासून पळ काढला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात चौकशीतून सूट मिळावी अशी याचिका केली. त्यावर ३ ऑगस्टला सुनावणी केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. पण २ ऑगस्टला त्यांना पुन्हा चौकशीला बोलवण्यात आले. अशा प्रकारे सुनावणीच्या एक दिवस आधी समन्स बजावणे योग्य नसून त्याबाबत ईडीच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते असं वक्तव्य देशमुखांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी केले.

“अनिल देशमुख यांनी चौकशीतून सवलत मिळावी या साठी पत्र दिले होते. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर उद्या सुनावणी आहे. सुनावणीची तारीख ३ ऑगस्ट आहे ईडीला माहिती असूनही ३० जुलैला त्यांनी देशमुखांना समन्स बजावले आणि आज हजर राहण्यास सांगितलं. या मागचा ईडीचा हेतू समजण्यापलिकडे आहे. सुप्रीम कोर्टातून जो कोणताही निकाल येईल, त्यानुसार अनिल देशमुख हे तपास यंत्रणांना सहकार्य करतील आणि पुढील वेळी चौकशीसाठी हजर राहतील”, असं सूचक विधान वकिल इंद्रपाल सिंग यांनी केले.
Also Read: Breaking: अनिल देशमुख गायब, फोन ‘नॉट रिचेबल’; ED कडून शोध सुरू
दरम्यान, अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने ३० जुलैला पुन्हा समन्स पाठवले होते. देशमुख यांना सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यापूर्वी देशमुख यांना तीन वेळा ईडीने समन्स बजावून चौकशीस उपस्थित राहण्यास सांगितले होते. याशिवाय त्यांचा मुलगा ऋषीकेश यालाही ईडीने समन्स बजावले आहे. पण अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीसाठी जाणे टाळले होते. वकिलांच्यामार्फत त्यांनी आपली अडचण सांगितली होती. त्यानंतर ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली तसेच, देशमुख नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्याविरोधात शोधमोहिमदेखील हाती घेतली गेली होती. अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्ट उद्या काय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
Esakal