खासदार नवनीत राणा (MP navneet rana) यांचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात.

नागपूर : खासदार नवनीत राणा (MP navneet rana) यांचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. कधी त्या शेतामध्ये पेरणी करताना दिसतात, तर कधी आदिवासी बांधवांसोबत नृत्य करताना. मात्र, सध्या नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ पुढे आलाय. त्यामध्ये त्या चक्क गोल-गोल भाकरी थापताना (navneet rana cooking video) दिसत आहेत. तसेच चुलीवर पोळ्या करताना देखील या व्हिडिओमध्ये त्या दिसत आहेत. मात्र, आपल्या लोकसभा मतदारसंघाचे (amravati loksabha constituency) कामे सांभाळून या सर्व कामांसाठी त्या कसा वेळ देतात आणि गोल-गोल भाकरी बनवायला त्यांना कुणी शिकविलं? याबातच ‘ई सकाळ’ने जाणून घेतलंय

Also Read: सीताबर्डीत आता फक्त ‘स्ट्रीट शॉपिंग’, वाहनांवर येणार बंदी

सासूबाईंकडून शिकले स्वयंपाक –

माझी सासू आणि माझी आई दोघीही हातावरील भाकरी बनवतात. मात्र, लग्नापूर्वी अशा भाकऱ्या बनविण्याची कधी संधीच मिळाली नाही. पण लग्नानंतर कुटुंबाची ओढ लागली. आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मुलांना आपल्या हातचं काहीतरी करून घालावं, असं नेहमी वाटायचं. त्यामुळे लग्नानंतर कामातून वेळ काढून सासूबाईंकडून भाकरी कशा बनवायच्या ते शिकून घेतलं. आमदार रवी राणा यांना देखील चुलीवरच्या भाकरी आवडतात. त्यामुळे मी आणखीनच आवडीने हे सर्व करते, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं.

चुलीवर स्वयंपाक बनविण्याची आवड –

आमचं सर्व कुटुंब हे गजानन महाराजांना मानतात. त्यामुळे दर गुरुवारी आमच्याकडे गजानन महाराजांसाठी बेसन-भाकरीचा नैवेद्य बनवत असतो. मात्र, कामाच्या व्यापामुळे नेहमी स्वतः चुलीवर स्वयंपाक करणं शक्य होत नाही. त्यामुळे इतरवेळी घरातील नोकरचाकर हे सर्व काम करतात. मात्र, सुट्टीच्या दिवशी माझ्या मुलांना किंवा आमदार रवी राणा यांना आवड झाल्यानंतर मी माझ्या हातचा स्वयंपाक करून खाऊ घालते. तो स्वयंपाक कधी कधी चुलीवरच बनविण्याचा प्रयत्न करते, असेही राणा सांगतात.

चुलीवर भाकरी थापताना खासदार नवनीत राणा

फक्त खायची आवड पाहिजे…

विदर्भाची खाद्यसंस्कृती ही अतिशय परिचित आहे. अनेक खवय्यांना या खाद्यसंस्कृतीने भूरळ घातली आहे. त्यामुळे खासदार राणा या विदर्भातील अनेक पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पुरणपोळी देखील अतिशय चांगली बनविता येते. मुंबईला असताना देवाला नैवेद्यासाठी स्वतःच पुरणपोळी बनवित असते. इतकेच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रीयन जेवण देखील बनविते. बेसन, भाकर आणि चटणी बनविण्यात हातखंड आहे. तसेच विदर्भातील प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ म्हणजे पाटोडी देखील बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचे राणा सांगतात. दरम्यान, महिलांना खायची आवड पाहिजे. त्यानंतर कुठलाही पदार्थ बनविता येणे कठीण नाही. आवड असेल तर आपण सहज एखादा पदार्थ शिकू शकतो, असेही राणा सांगतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here