कोल्हापूर : साधारणत: तीस वर्षांपूर्वी पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावाने प्रगतीची नवी दिशा अंगिकारली आहे. उपलब्ध पाण्यावर माळवं (भाजीपाला) पिकवून संसाराचा गाडा हाकणारे हे गाव गेल्या काही वर्षांत सुमधुर बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करत आहे. माळवं आणि बर्फीच्या रोजच्या ताज्या पैशामधून गाव कात टाकू लागले आहे. जुन्या कौलारू घरांच्या जागी नवे टुमदार बंगले उभे राहत आहेत.
अनेक घरांच्या दारासमोर चारचाकी गाड्या घराघरांचे वैभव अधोरेखीत करत उभ्या आहेत. कष्टातून वसंत फुलतो तो हा असा.एके काळी पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या गावाला विहिरींचाच काय तो आधार होता. उसासारखे पीक घेण्याएवढे पाणी उपलब्ध नव्हतेच. मग गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर वांगी, वरणा, दोडका, कोबी ही माळव्याची पिके घेऊन संसाराला हातभार लावणे सुरू केले. शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांत पिकणारे माळवे घेऊन भोगावती, बिद्री या साखर कारखाना पट्ट्यातील सधन भागातील गावात जाऊन विकण्याचा दिनक्रम सुरू झाला आणि ठिकपुर्लीच्या ताज्या व चवदार माळव्याला घराघरांतून पसंती मिळू लागली. कृषिभूषण (कै.) महादेवराव चौगले यांनी त्याला आधुनिकतेची जोड दिली. शेतीला नवी दिशा मिळाली. सद्यस्थितीत शंभरावर कुटुंबे शेतांतून माळवे फुलवत आहेत. येथून ताजी भाजी थेट कोकणात जात आहे. नवी पिढी आता ग्रीन आणि पॉली हाऊसच्या माध्यमातून या व्यवसायाला नवी दिशा देत आहे. अधिकाधिक दर्जेदार भाजीचे उत्पादन घेत आहे.
Also Read: जाणून घ्या ; जीन्स निळ्या रंगाने का रंगवतात?

भाजी उत्पादनाने स्थिरता आलेल्या या गावाची आता दुधाच्या बर्फीचे गाव, अशी नवी ओळखही ठळक होऊ लागली आहे. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी येथील तानाजी मळगे, बाबूराव पाटील आदींनी खव्याची बर्फी तयार करण्यास सुरुवात केली. बर्फीमधून अर्थार्जन वाढत आहे हे ध्यानात येताच अनेकांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून बर्फी तयार करण्यास प्रारंभ केला. गावात दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनविण्यास प्रारंभ होतो. डेअरी व परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध विकत घेतले जाते आणि मग धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो. गावात दररोज बाराशे लिटरपर्यंत म्हशीचे दूध आटवले जात आहे. त्यातून १३ ते १४ हजार बर्फी नगांची निर्मिती होत आहे.

निव्वळ खव्याची बर्फी म्हणून ती आज जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर आवडीने लोक खातात. या बर्फीलाही मागणी वाढत आहे. ही बर्फी तोंडात टाकताच वेगळीच चव आणि खमंगपणा जाणवतो आणि हेच ठिकपुर्लीच्या बर्फीचे वेगळेपण आहे. सुरुवातीला काही किलोमध्ये विकल्या जाणाऱ्या बर्फीचा आता हजारो किलो पुरवठा होऊ लागला आहे. बर्फीच्या विक्रीमधून दररोज दीड लाखापर्यंत तर माळव्यातूनही दीड लाखापर्यंत रोजची उलाढाल होत आहे. कधी काळी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या या गावाचा हा ठसा कायमचा पुसला गेला आहे. हिरवेगार माळवे आणि खमंग चवीच्या बर्फीचे गाव म्हणून गावाची स्वतंत्र आणि नवी ओळख दृढ झाली आहे, तर अनेकांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.
Esakal