हिंदी चित्रपटसृष्टीतील हजारो गाण्यांना आपल्या आवाजाने अजरामर करणारे किशोर कुमार म्हणजेच किशोरदांचा आज वाढदिवस. किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्ण होऊच शकणार नाही.
अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, निर्मिती, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 झाला. अफलातून अदाकारीने एकेकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या किशोरदांचा आवाज आजच्या तरूण पिढीलाही भावत आहे. यांनी गायलेली गाणी आजही कोट्यवधींच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. ते केवळ गायकच नव्हते तर अभिनेते, संगितकार, दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक म्हणूनही प्रसिद्ध होते. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी बंगाली, मराठी, असामी, गुजराती, कन्नडा, भोजपुरी, मल्याळम, ओडिसा व उर्दुमध्ये गाणी गायली.चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 8 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. लता मंगेशकर पुरस्काराबरोबरच मध्यप्रदेश सरकारने पुरस्कार देऊन गौरविले. शिवाय, मध्यप्रदेश सरकारने त्यांच्याच नावाने ‘किशोर कुमार पुरस्कार‘ सुरू केला आहे.“शिकारी‘ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनेता म्हणून काम केले. यात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी अनेक गाण्यांना आपल्या आवाजाचा साज चढविला. रूप तेरा मस्ताना…, दिल एैसा किसे ने…, खैके पान बनारसवाला आदी गाण्यांना फिल्मफेअरचा पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला. जिंदगी एक सफर…, ये जो मोहब्बत है…, चिंगारी कोई भडके… आदी गाणी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आली होती. सोशल मीडियापासून ते आकाशवाणीच्या केंद्रापर्यंत आज सर्वत्रच या गायकाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. “जिद्दी‘ या चित्रपटात त्यांना गाण्याची प्रथम संधी मिळाली. यानंतर त्यांना गाण्याच्या अनेक संधी मिळाल्या.चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिले जाते. अशा या महान गायकाविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रचंड आदरभाव आहेत यात शंका नाही. अशा अनेक सदाबहार गितांनी मंत्रमुग्ध करणारे पार्श्वगायक किशोर कुमार यांचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1987 रोजी झाला. त्यांचा सदाबहार आवाज आजही अजरामर आहे.