फलटण शहर (सातारा) : टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेत धनुर्विद्या खेळासाठी पात्र ठरलेल्या ‘तिरंदाज प्रवीणच्या कुटुंबीयांचा घरासाठी संघर्ष’ हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिध्द होताच विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर Speaker Ramraje Naik-Nimbalkar, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) या लोकप्रतिनिधींसह अनेकांनी जाधव कुटुंबीयांना पाठबळ व्यक्त केले. प्रशासकीय पातळीवरही तातडीने हालचाली होवून जागेचा प्रश्नही लवकरात-लवकर मार्गी लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

प्रवीण जाधवच्या कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आपण कदापि येवू देणार नाही, अशी ठोस भूमिका सभापती रामराजेंनी घेतली आहे.

सरडे (ता. फलटण) येथील ऑलिम्पिकपटू तिरंदाज प्रवीण जाधव (Archer Pravin Jadhav) याच्या आई-वडिलांना घर पाडण्याच्या धमकीमुळे हे कुटुंब भीतीच्या छायेखाली असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिध्द झाले. सदरची बातमी सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल झाल्याने जाधव कुटुंबीयांना अनेक स्तरावरुन पाठबळ व्यक्त करण्यात आले. पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समक्ष सरडे येथे भेट दिली. यानंतर जाधव कुटुंबीय व त्यांना विरोध करणाऱ्यांची बैठकही बरड पोलिस ठाण्यात घेण्यात आली. या बैठकीत सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्यात आल्याचे व दोघांकडून आमची कुठलीही तक्रार नसल्याचे लेखी घेण्यात आले.

प्रवीण जाधव हा सध्या सैन्य दलामध्ये नियुक्त असल्याने त्याच्या कुटुंबास त्रास होत असल्याची सैन्य दलानेही गंभीर दखल घेतली असल्याने सैन्य दलाचे कर्मचारी, संघटनांचे प्रतिनिधींनी सरडे येथे येवून परिस्थितीची माहिती घेतली. प्रशासकीय पातळीवरुनही सदर जागा जाधव कुटुंबीयांच्या रितसर नावे होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, त्यानुसार राजाळे येथील मंडलअधिकाऱ्यांनी आज प्रवीणच्या वडिलांकडून सरडे येथून जागा मागणी अर्ज नेला आहे. सदर प्रस्ताव तयार करुन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. आम्ही भूमिहीन असून आमच्या जागेचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा व प्रवीणचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार व्हावे, हीच माफक अपेक्षा जाधव कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.

Also Read: ऑलिम्पियन प्रवीण जाधवच्या ‘वादात’ साताऱ्याच्या नेत्यांची उडी!

Pravin Jadhav family

प्रवीण जाधवच्या कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आपण कदापि येवू देणार नाही. हा वाद अथवा प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहोत. लवकरात लवकर हे प्रकरण मिटविण्यात येईल. प्रवीणने केवळ खेळावर लक्ष केंद्रित करावे.

-रामराजे नाईक-निंबाळकर सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र

प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल. त्यांची परिस्थिती किती हालाकीची आहे, हे मी पाहिले आहे. त्यास जागा मिळण्यासाठी व घरासाठी खासदार म्हणून आर्थिक सहकार्य करणार असून जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर अन्यत्र जागा घेवून घर बांधण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत निश्चितपणे करु.

-रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार, माढा लोकसभा

रमेश जाधव यांच्याकडून जागा मागणीचा अर्ज मंडल अधिकाऱ्यांनी घेतला आहे. यानंतर मोजणी व ‘अबकड’ प्रस्ताव तयार करुन ते जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल. तेथून तो शासनाकडे जाईल. जाधव कुटुंबीयांचा जागेचा प्रश्न लवकर मार्गी लागेल.

-डॉ. शिवाजीराव जगताप प्रांताधिकारी, फलटण

Also Read: ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here