खळद : पुणे जिल्ह्यामध्ये बेलसर (ता.पुरंदर) येथे राज्यातील पहिला झिका पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती. या पार्श्वभूमीवर या भागांमध्ये आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीने ही परिस्थिती अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळली असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याबाबत केंद्रीय आरोग्य पथकाने समाधान व्यक्त केले.
‘झिका’च्या पार्श्वभूमीवरती गुरूवारी केंद्रीय आरोग्य पथकाने बेलसरची पाहणी करून आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. या पथकामध्ये केंद्रीय एन.आय.एम. आर. चे डाॅ. हिम्मत सिंग पवार, केंद्रीय लेडी हार्डिंग मेडीकल हाॅस्पिटल च्या डॉ. मिसेस नैन शिल्पी, एन. आय. व्ही. पुणे चे डॉ. मंगेश गोखले, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय बेंद्रे, राज्य आरोग्य विभागाचे डॉ. महेंद्र जगताप, डॉ. प्रणिल कांबळे उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता हे पथक बेलसर येथे दाखल झाले यानंतर एक वाजेपर्यंत बेलसर आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने या काळामध्ये केलेल्या कामाचा आढावा या पथकाने घेतला. व यानंतर प्रत्यक्ष गावांमध्ये घरोघरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. येथील प्रतिबंधात्मक उपाययोजना योग्य पद्धतीने सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असून थोड्याफार प्रमाणात सुधारणा करण्याची गरज असल्याचे डॉ. हिम्मत सिंग पवार यांनी सांगितले.

याबाबत बोलताना डॉ. अजय बेंद्रे यांनी या भागांमध्ये डेंगू , चिकनगुनियाची साथ पसरल्यानंतर आतापर्यंत जवळपास १५२ नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले आले असून यामध्ये ५ डेंग्यू, ६३ चिकनगुनिया व १ झिकाचा रुग्ण आढळला आहे. तर झिकाच्या रुग्णाला झिका सोबतच चिकनगुनियाचीही लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण सुरू केले असून बेलसर बरोबरच खानवडी, वाळुंज, निळुंज, कोथळे, पारगाव या गावांमध्ये ताप व गर्भवती महिलांचे सर्वेक्षण केले असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये बेलसर मध्ये २४ गर्भवती महिला तर परिसरातील गावातील ७९ गर्भवती महिलांची तपासणी केली असल्याचे सांगितले. या भागात मोठ्याा प्रमाणावर टोमॅटोची शेती होते, यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून व्यापारी येतात व सतत माल वाहतूक होत असते या नागरिकांचीही तपासणी करण्यात आले आहे . सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणताही धोका नाही मात्र नागरिकांनी हा डास दिवसा चावतो यासाठी फुल कपडे वापरावेत, शरीराला ओडोमास सारखे डास प्रतिबंधक लोशन लावावे, गर्भवती महिला व मुले यांनी आपले डासांपासून संरक्षण करावे, पाण्याची साठवणूक करू नये, शक्यतो दिवसा व रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

झिकाच्या संसर्गापासून गर्भवती महिलांना जास्त धोका संभवतो. गर्भवती महिला बाधित झाली तर तिच्यापासून गर्भातील मुलाला धोका संभवतो, मुलगा मंदबुद्धी जन्माला येऊ शकतो.तरी या महिलांनी याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तर पाच ते सहा महिन्यांच्या गर्भवती महिलांना हा धोका कमी संभवतो तरीसुद्धा बाळ जन्माला आल्यानंतर त्याची बालरोगतज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
– डॉ. मिसेस नैन शिल्पी, केंद्रीय लेडी हार्डिंग मेडीकल हाॅस्पिटल
“राज्यातील पहिला रुग्ण या भागात आढळला असला तरीही आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने काम करीत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये व डास प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत प्रशासन देत असणाऱ्या सूचनांचे पालन करीत प्रशासणाला सहकार्य करावे.
– संजय जगताप, आमदार
Esakal