जालन्याला ब्रिटिशकाळापासून १८९५ ते १९५३ पर्यंत ४०० बेडचे मनोरुग्णालय होते, १९५३ला ते रुग्णांसह हैद्राबादला हलविल्याचे त्यांच्या आजीकडून कळाले.

जळगाव : ब्रिटिशकाळापासून (British period) जालन्यात (Jalna) असलेले भव्य मनोरुग्णालय (Psychiatric hospital) नंतरच्या काळात हैद्राबादला (Hyderabad) हलविण्यात आले.. या टप्प्यात जालन्यातून या हॉस्पिटलचा पुसला गेलेला इतिहास अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने शोधून काढलांय तो जळगावातील विख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीरज देव (Psychiatrist Dr. Neeraj Dev) यांनी..

Psychiatric hospital

जालन्यात नुकतेच मनोरुग्णालय मंजूर झाले व त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नांनी ते मंजूर झाल्याचे बोलले जात असले तरी इतिहासात काही त्रुटींमुळे या मनोरुग्णालयाची पुसलेली पाने शोधून काढण्याचे संशोधन ज्या खानदेशातील तज्ज्ञाने केले त्या डॉ. देव यांच्या प्रयत्नांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

असा सुरु झाला शोध
मुळात राज्यात केवळ येरवडा (पुणे), रत्नागिरी, ठाणे व नागपूर अशा चार ठिकाणी मनोरुग्णालये आहेत. खानदेश, मराठवाड्यातील रुग्णांसाठी ही चारही रुग्णालये दूर असल्याने सोयीची नाहीत. या दोन्ही क्षेत्रांच्या दृष्टीने सोयीचे म्हणून एखादे रुग्णालय हवे म्हणून डॉ. नीरज देव यांनी प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांत त्यांना जालन्याला ब्रिटिशकाळापासून १८९५ ते १९५३ पर्यंत ४०० बेडचे मनोरुग्णालय होते, १९५३ला ते रुग्णांसह हैद्राबादला हलविल्याचे त्यांच्या आजीकडून कळाले. त्यातून या रुग्णालयाचा शोध सुरु झाला.

Psychiatrist Dr. Neeraj Dev

पाश्‍र्वभूमी आली समोर
डॉ. देव यांनी या रुग्णालयाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी काही जुनी कागदपत्रे, नोंदींच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु झाला. माहितीच्या अधिकारात त्यांनी ११ मुद्यांच्या आधारे महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्य सरकारांकडे माहिती मागवली. ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र शासनाने त्यासंबंधी आरोग्य संचालनालयाचा संदर्भ दिला, तर या संचालनालयाने औरंगाबाद आरोग्य उपसंचालकांकडे माहिती घेण्यासंबंधी सूचित केले. या शोधप्रवासात डॉ. देव यांनी काही जुनी गॅझेटस्‌ धुंडाळली.. जालन्यातील बुजूर्ग लोकांना रुग्णालयाबबत विचारले. तेथील एका वयोवृद्ध मुस्लिम डॉक्टरने ‘दारुल मजानिन’ या नावाने जालन्यात भव्य रुग्णालय होते या इतिहासाला दुजोरा दिला.

चुकीचा इतिहासही समोर
या शोधकार्यात डॉ. देव यांच्यासमोर रुग्णालयाचा चुकीचा इतिहासही समोर आला. हैद्राबादच्या यंत्रणेतून हे हॉस्पिटल १८९५ला हैद्राबादला स्थापन झाले, १९३९ला ते जालन्यात स्थलांतरित झाले आणि पुन्हा १९५३ला हैद्राबादला हलविल्याचा चुकीचा इतिहासही मांडल्या गेल्याचे डॉ. देव यांना समजले. या इस्पितळात निजामाच्या एका बेगमवरही उपचार केल्याचा दाखला यानिमित्ताने समोर आला.

पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरु
जालन्याला हे मनोरुग्णालय होते, यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी डॉ. देव यांनी प्रयत्न सुरु केले. २०१३, जानेवारीत त्यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन या मनोरुग्णालयाच्या जालन्यातील अस्तित्वाचे पुरावे सादर करत माहिती दिली. पुन्हा हे हॉस्पिटल सुरु व्हावे, यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरु झाला.

Psychiatric hospital

मंजुरी व भूमिपूजन
या पाठपुराव्याला यश येताना २०१५मध्ये तत्कालीन राज्य सरकारने जालन्यात मनोरुग्णालयास मंजुरी दिली. गेल्यावर्षी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते त्याची पायाभरणी झाली. परंतु, मंजुरीपासून आतापर्यंत त्यासाठी निधीची तरतूद होऊ शकली नव्हती. जालन्याचेच लोकप्रतिनिधी असलेल्या राजेश टोपेंकडे आरोग्य खाते असल्याने त्यांनी परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली. या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे व मनुष्यबळ यासाठी १०४ कोटी ४४ लाखांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भातील किमान १४ जिल्ह्यांतील रुग्णांची त्यामुळे सोय होईल..

Also Read: भुजबळ,राज गेलेत..तरी सेना दिमाखात उभी- गुलाबराव पाटील

टोपेंकडून कृतज्ञताही नाही
मुळात स्वत: राजेश टोपे हे मितभाषी व प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. कोविड काळात त्यांनी राज्यासाठी केलेल्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. जनतेनेही त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मात्र, आपल्याच मतदारसंघात कधीकाळी असलेल्या मनोरूग्णालयाचे असित्त्व शोधून ते त्याच जालन्यात पुनर्स्थापित करण्यासाठी एक झपाटलेला तज्ज्ञ प्रयत्न करतो, त्याची दखलही टोपेंनी घेतली नाही, हे दुर्दैवच. किमान कृतज्ञता म्हणून तरी डॉ. देव यांना फोन करणे, त्यांच्या कार्याची दखल व नोंद ठेवणे आवश्‍यक होते. या धांडोळ्यातून तरी मंत्री टोपे डॉ. देव यांच्या संशोधनाची दखल घेतील, अशी अपेक्षा आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here