पुणे – विकासकामांसाठी रस्ते खोदले, (Road Digging) पण हे रस्ते व्यवस्थित बुजवणार कोण? गाडी चालवताना एकही रस्ता १०० टक्के स्वच्छ, खड्डेविरहित लागत नाही. ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत, निसरडे झाल्याने घसरून पडायची भीती आहे. मूळ रस्ता आणि डांबर-सिमेंट टाकून बुजविलेला रस्ता यांची ‘लेव्हल’ (Level) बिघडली आहे, मात्र महापालिका प्रशासनाचे (Municipal Administrative) याकडे लक्ष नाही. महापालिकेचे विभाग एकमेकांकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहेत. यातून वाहनचालकांच्या जिवाला (Life) निर्माण झालेल्या धोक्याकडे (Danger) लक्ष देणार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या पथ विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि सांडपाणी विभागाने लॉकडाऊनच्या काळात रस्ते रिकामे असल्याने मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाणीपुरवठा विभागाकडून ‘२४ बाय ७’ पाणी योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले. सांडपाणी विभागाने मध्यवर्ती पेठांमध्ये नव्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले. महापालिकेने ठेकेदारांसोबत केलेल्या करारामध्ये खड्डे बुजविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच देण्यात आलेली आहे. महापालिकेला हे करावे लागत नसले, तरी काम कशा पद्धतीने होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची जबाबादारी आहे. मात्र, तीदेखील पार पाडली जात नसल्याने शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत.

सिमेंटची डागडुजी खचण्यास सुरवात
पाणीपुरवठा विभागातर्फे आत्तापर्यंत शहरातील सुमारे ५०० किलोमीटरचे रस्ते खोदून झाले आहेत. तेथील काम झाल्यानंतर ठेकेदाराने सिमेंट काँक्रिट टाकून रस्ते बुजविले. काही दिवस रस्ते चांगले राहिले, पण वाहनांची वर्दळ जशी वाढली, तशी रस्ते खचण्यास सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट निघून मोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर वाहने खड्ड्यात आदळून कमरेला हिसके बसत आहेत. सांडपाणी विभागाने बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता येथे खोदकाम केले. काही ठिकाणी सिमेंटने, तर काही ठिकाणी डांबराने खड्डे बुजविले आहेत. मात्र, पावसामुळे या कामाची पोलखोल होऊन ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत. दुचाकी, चारचाकी चालकांची गाडी चालवताना तारांबळ उडत आहे.
प्रशासनाच्या धोरणामुळे चालकांचे मोडले कंबरडे
शहरातील रस्ते खोदल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराकडे दिले आहे. पाणी पुरवठ्याचे काम असेल, तर याच विभागाकडून त्यात लक्ष घातले जाते. सांडपाणी विभागाचे काम असल्यास त्या विभागाकडून पाहणी केली जाते. पाणी पुरवठा विभाग सिमेंट टाकून रस्ते दुरुस्त करतात, तर सांडपाणी विभाग काही ठिकाणी डांबर व काही ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकत आहे. खड्डे बुजविण्याच्या कामात प्रत्येक विभाग वेगवेगळे धोरण तयार करत आहे. पथ विभागाने हे काम आमचे नाही, असे सांगत हात वर केले आहेत.
Also Read: महावितरणने पकडली 25 लाखांची वीजचोरी
बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यावर प्रामुख्याने सांडपाणी वाहिनी टाकल्या आहेत. काही ठिकाणी डांबराने, तर काही ठिकाणी सिमेंटने खड्डे बुजविले गेले आहेत. खड्डे पडलेल्या व लेव्हल नसलेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या आहेत.
– विलास फड, कार्यकारी अभियंता, सांडपाणी विभाग
शहरात २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुमारे ५०० किलोमीटरची जलवाहिनी टाकली आहे. हे काम झाल्यानंतर लगेच सिमेंट काँक्रिट टाकून रस्ते दुरुस्त केले, पण जेथे काम चांगले झालेले नाही, खड्डे पडले आहेत, रस्ता खचला आहे, अशा ठिकाणी पुन्हा व्यवस्थित सिमेंट टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील १० दिवसांत हे काम पूर्ण होईल.
– अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग
महापालिकेने एका महिन्यापूर्वी कर्वेनगर येथे अलंकार पोलिस ठाणे ते चितळेबंधू चौकापर्यंत पाइपलाइन व केबल टाकल्या. त्यानंतर रस्ता सिमेंट काँक्रीटने भरण्यात आला. त्यामुळे अर्धा रस्ता सिमेंटचा आणि अर्धा डांबराचा… असा विचित्र प्रकार झाला आहे. त्यातच सिमेंट काँक्रिटचा रस्ता खचला आहे. आयुक्तांनी लक्ष घालून ही समस्या सोडविली पाहिजे.
– प्रशांत भोलगीर, सामाजिक कार्यकर्ते
पाणीपुरवठा व सांडपाणी विभागाकडून काम सुरू असून, त्याच विभागांकडून रस्त्याची दुरुस्ती केली जाते. रस्ते खचल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे, त्यामुळे रस्ते दुरुस्त केले जातील. पाऊस थांबल्यानंतर महत्त्वाच्या रस्त्यांचे पूर्णपणे डांबरीकरण केले जाणार आहे.
– व्ही.जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग
आपल्या भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीनंतर खचलेल्या रस्त्यांची छायाचित्रे आणि माहिती (शंभर शब्दांत) लिहून आम्हाला पाठवा.
ई मेल – editor@esakal.com
Esakal