या एटीएम मशीनमधील पैसे काढून चोरट्यांनी सदरील एटीएम मशिन औंढा वसमत रस्त्यावर पांगरा पाटी शिवारामध्ये एका पाण्याच्या डोहामध्ये फेकून दिले आहे
शिरडशहापूर (हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवले आहे. मशीन चोरून नेऊन त्यातील रक्कम काढून मशीन पाण्यात टाकल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) पहाटे चार वाजता घडली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापुर येथे एसबीआय बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये गुरुवारी (5 जुलै) रोजी त्रेचाळीस लाख रुपये टाकण्यात आले होते. अशी माहिती देण्यात आली आहे. त्याची पाळत ठेवून चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चक्क एटीएम मशीनच उचलून नेले. एटीएम मशीनजवळ असलेले सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बंद आहेत.

या एटीएम मशीनमधील पैसे काढून चोरट्यांनी सदरील एटीएम मशिन औंढा वसमत रस्त्यावर पांगरा पाटी शिवारामध्ये एका पाण्याच्या डोहामध्ये फेकून दिले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील दिशेने तपास करीत आहेत.
Also Read: प्रवाशांचे हात धरून रिक्षात बसवण्याची स्पर्धा!
याआधी दोन वर्षांपूर्वीही देखील चोरट्यांनी शिरडशहापुर येथील एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळेस चोरट्यांना त्यात यश आले नव्हते. दरम्यान परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून दोन महिन्यांपूर्वी डोळ्यात लाल तिखट टाकून दोन लाख रुपये रक्कम लुटण्यात आली होती. तसेच पंधरा दिवसांपूर्वी वाई येथील पेट्रोल पंपावर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पैसे लुटण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत पोलिसांना सदरील चोरटे पकडण्यात अपयश आलेले आहे.
Esakal