ढेबेवाडी (सातारा) : मराठवाडी धरणातील (Marathwadi Dam) पाण्याच्या फुगवट्यात अनेक खांब बुडाल्याने तब्बल १४ दिवसांपासून बंद असलेला दुर्गम निगडे, कसणी, घोटील या दुर्गम गावांसह लगतच्या वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा महावितरण (MSEDCL) व ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नदीपात्रात जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर काल सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सुरळीत झाला. जवळपास निम्मा महिना अंधारात काढलेल्या संबंधित गावांतील जनतेला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

विजेचे खांब पाण्यात बुडाल्याने निगडे, घोटील, कसणीसह वाड्यावस्त्या तब्बल 14 दिवसांपासून अंधारात चाचपडत होत्या.

मराठवाडी धरणातील पाण्याचा फुगवटा आणि मुसळधार पाऊस (Heavy Rain) यामुळे यामुळे सावंतवाडी-धनावडेवाडी दरम्यानचे विजेचे खांब पाण्यात बुडाल्याने निगडे, घोटील, कसणीसह वाड्यावस्त्या तब्बल १४ दिवसांपासून अंधारात चाचपडत होत्या. तीन खांबांपैकी एक पुरातून वाहून गेला होता, तर दुसरा कोसळला होता. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्‍भवू नये म्हणून नदीपात्राच्या अलीकडे व पलीकडे नवीन उंच खांब उभारून पुरेशा उंचीवरून वीज वाहिन्या नेण्याशिवाय पर्याय नव्हता. भरून वाहणारी नदी आणि पूल तुटल्याने ठप्प झालेले दळणवळण अशा गंभीर परिस्थितीत वीज कंपनीचे कर्मचारी जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात व्यस्त होते. ११ मीटर लांबीचे अवजड खांब काही अंतरापर्यंत गाडा वापरून आणि तेथून पुढे खांद्यावरून नदीपर्यंत नेण्यात आले. नदीच्या अलीकडच्या काठाला खांब उभारल्यानंतर दुसऱ्या काठावर खांब पोचविण्याचे आव्हान होते. तुटलेल्या पुलावरून, तसेच पाण्यातून सर्वांनी खांदा लावून खांब नदीपलीकडे नेले. वीज वाहिन्या, तसेच अन्य साहित्य बोटीतून पलीकडे पोचविण्यात आले. त्यानंतर जोडणी करून सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Also Read: माण-खटावात ‘नवचैतन्य’; जनता दलाच्या कमानेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Nigde

कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, उपकार्यकारी अभियंता स्वप्नील जाधव, सहायक अभियंता धनंजय शेडे, सागर यादव, विशाल मोहिते, कऱ्हाड पालिकेच्या अग्निशमन दलाचे अविनाश फडतरे व त्यांचे सहकारी यांच्यासह ठेकेदार कुंभार इलेक्ट्रिकचे कर्मचारी आणि ढेबेवाडीसह मारुल हवेली, तळमावले येथील वीज कर्मचाऱ्यांच्या टीमने मोठी मेहनत घेऊन ही धाडसी मोहीम यशस्वी केली. ‘सततचा पाऊस, तुटलेल्या पुलांमुळे ठप्प झालेले दळणवळण आणि भरलेले नदीपात्र यामुळे मोठ्या अडचणींनी भरलेली मोहीम अधिकारी, कर्मचारी व सर्व सहकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी यशस्वी झाल्याचे सहायक अभियंता विशाल मोहिते यांनी सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here