नाशिक रोड : महापालिका निवडणुका सहा महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे येथे तिकिटासाठी आतापासूनच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लॉबिंग सुरू झाले आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते केवळ आंदोलने करीत आहे. उमेदवारीची शक्यता रामभरोसे असल्याचे चित्र सध्या नाशिक रोडमध्ये पाहायला मिळत आहे.
वॉर्ड रचना कशीही होवो जनसंपर्क मात्र टिकायला हवा
प्रभाग रचना अजून होणे बाकी आहे. त्यामुळे संभाव्य इच्छुक प्रभागांमध्ये संपर्क वाढविण्या भर देत आहे. वॉर्ड रचना कशीही पडली तरी संपर्क टिकायला हवा, या उद्देशाने अनेक इच्छुक आणि विद्यमान नगरसेवक सध्या जनसंपर्क वाढविण्याकडे जोर देत आहे. होर्डिंग बाजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्न साखरपुडा, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. सहापैकी प्रत्येक प्रभागात आजी- माजी नगरसेवकांनी उमेदवारीसाठी आपले नाव निश्चित असल्याचे गृहित धरले आहे.
Also Read: मोटेरा स्टेडियमलाही वल्लभभाई पटेलांचे नाव हवे – छगन भुजबळ

बालेकिल्ला टिकविण्याचे आव्हान
नाशिक रोड हा सुरवातीपासून सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, मात्र मागील पंचवार्षिकला भाजपने सेनेला जोरदार टक्कर देत तेवीस जागांपैकी सर्वाधिक बारा जागा मिळविल्या. सध्या वारे पाहता सेना आणि भाजप या दोन प्रतिस्पर्धीमध्ये घासून टक्कर होण्याची शक्यता आहे. भाजप – सेना या दोन्ही पक्षाचेच बावीस नगरसेवक आहेत. असे असलेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनदेखील जोरदार तयारी राहणार आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यकर्ते झगडत आहे. राष्ट्रवादीकडे स्थानिक नेत्यांची फळी अधिक सक्षम असल्याने पालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे. राष्ट्रवादीचा सध्या एकच नगरसेवक असल्याने ही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. उमेदवारी नक्की कुणाला मिळणार याविषयी प्रत्येकाला चिंता वाटायला लागली आहे.
‘त्या’ नऊ जागा महत्त्वाच्या
मागील निवडणुकीत प्रभाग वीसमधून भाजपचे संभाजी मोरुस्कर, संगीता गायकवाड, अंबादास पगारे, सीमा ताजणे हा भाजपचा सर्व पॅनेल विजयी झाला. अठरामधून विशाल संगमनेरे, मीरा हांडगे, शरद मोरे, तर सतरामधून सुमन सातभाई, दिनकर आढाव हे भाजपचे नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे तीनच प्रभागातून भाजपचे तब्बल नऊ नगरसेवक निवडून आले, याचा फायदा पक्षाला नाशिक रोड प्रभाग सभापती निवडणुकीत होऊन नाशिकरोड मध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. दरम्यान, या जागा पुन्हा मिळविण्यासाठी भाजपला जोमाने काम करावे लागणार आहे. दरम्यान, प्रभाग रचना रद्द होऊन वॉर्ड पद्धत असणार आहे, मात्र वॉर्ड रचना कशी असेल याबाबत अद्याप चित्र स्पष्ट होत नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
(Nashik-Municipal-Elections-ShivSena-BJP-NCP-struggle-for-winning-political-news)
Also Read: नाशिकचे नेमके जिल्हाधिकारी कोण? एका पदाबाबत कमालीची चर्चा!
Esakal