निसर्गाने जगाला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे निसर्ग. असंच सुंदर आणि विस्तीर्ण जंगल मुंबईसारख्या काँक्रीटचा भार झेलणाऱ्या शहारालाही लाभला आहे. शहराच्या मध्यभागी एव्हढं अफाट जंगल आणि त्यात ओतप्रोत भरलेलं नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या जगभरातील मोजक्या ठिकाणांपैकी नॅशनल पार्क एक ठिकाण.मुंबई महानगरामध्ये वसलेलं 103 चौ.कि.मी च्या या जंगलात प्रवेश केल्याशिवाय कळत नाही आणि एकदा आत गेलो तर आपण मुंबईत आहोत असं अजिबात वाटत नाही, इतकं हे राष्ट्रीय उद्यान मनावर गारूड घालतं. हे शहरातलं जंगल आहे. शहराच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवनाला मिळणारा हा समृद्ध आरोग्यदायी असा हिरवा श्वास आहे.उद्यानात प्रवेश करणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी शेकडो पक्षी आणि प्राण्यांच्या प्रजाती स्वागतासाठी सज्ज असतात. त्यांचा पाहुणचार मिळाला तर मग सोने पे सुहागाच. सुमारे 274 पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती इथे आढळतात. प्राण्यांच्या 35, सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांच्या 78 प्रजाती आढळतात. मुंगूस, उदमांजर, रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 103.84 किलोमीटरची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाटाचा भाग असल्याने येथे पश्चिम घाटातील जैवविविधता पाहायला मिळते. मुंबईचा सुमारे 20 टक्के भूभाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या राष्ट्रीय उद्यानात ब्रिटिशांनी बांधलेल्या विहार आणि तुळशी तलावांचा समावेश आहे. डोळ्यांचे पारणे फिटणारा नजारा येथून न्याहाळता येतो. उद्यानात फिरत असतानाच डोळ्यांची पारणे फेडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे आणि नेत्रदीपक पक्षी दर्शन देतात. उद्यानात बटरफ्लाय गार्डन आहे. तीत 170 प्रजातींच्या फुलपाखरांचा गोतावळा आढळतो. कॉमन क्रो, द कॉमन टायगर, ब्लू टायगर, ग्रे पॅन्झी, द कॉमन जॅझबेल, द डार्क ब्रॅण्डेड बुशब्राऊन, द कॉमन एमिग्रंट, द टेल्ड जे, द ग्रेट ऑरेंज टिप ही यातील काही सहजपणे दृष्टीस पडणारी फुलपाखरे. जगातला सगळ्यात मोठा अॅटलास मॉथ राष्ट्रीय उद्यानात आढळतो.जंगल प्रत्येक ऋतूत सुंदर दिसतं असं म्हणतात. त्यामुळेच मुंबईलाही सौंदर्य प्राप्त झाले आहे. अनेकांना हा अनुभव बोरिवली पूर्वला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत नेहमीच येतो. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूत इथं पर्यटक येत असतात. कधी एकटे,कधी मित्रांसोबत,कधी घरच्यांसोबत तर कधी कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत इथे येऊन नैसर्गिक सौंदर्याचे सोनं लुटण्याचा मोह मात्र कुणालाही आवरता येणे शक्य नाही.