जागतिक ज्युनिअर स्पर्धेत विश्वविक्रम करून स्वतः मधील अफाट गुणवत्तेची चुणूक अठराव्या वर्षीच दाखवून देणाऱ्या नीरज चोप्राने आज सुवर्ण कामगिरी केली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भालाफेकीत त्याने ‘सुवर्ण पदकाचा’वेध घेतला.
ऑलिंपिकच्या इतिहासातील त्याचे हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. कुस्तीतही बजरंग पुनियाने कमाल करत ब्राँझ पदक पटकावले. त्यामुळे एकाच ऑलिंपिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक सात पदकांची कमाई केली आहे.
भालाफेकीच्या स्पर्धेमध्ये जगभरातील दिग्गज देश मैदानात उतरले असताना नीरजने अन्य देशांच्या खेळाडूंच्या तोडीस तोड कामगिरी केली. ही ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्यापासूनच सगळ्या देशाच्या नजरा नीरजच्या कामगिरीकडे लागल्या होत्या.
भालाफेकीत नीरजने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून इतर स्पर्धकांना जवळही फिरकू दिले नाही.
एवढा लांब भाला फेकल्यावर भारताचे सुवर्णपदक तेथेच निश्चित झाले होते
देशासाठी आणि माझ्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे. या क्षणावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाही. अनेक दिवसांनंतर भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. अंतिम फेरीमध्ये आपली चांगली कामगिरी होईल याची मला पूर्ण खात्री होती पण सुवर्ण पदक मिळेल असे वाटत नव्हते. मला याचा आनंद होतो आहे. – नीरज चोप्रा, भालाफेकपटू
‘४७’ चा असाही योगायोग
ऑलिंपिकमध्ये अखेरच्या दिवशी भारताला दोन पदके मिळाली. त्यामुळे पदकांच्या क्रमवारीतील भारताचे स्थान ६६ वरून थेट ४७ वर आले आहे. या कामगिरीचे सोशल मीडियामध्ये देखील पडसाद उमटायला सुरूवात झाली असून ‘१९४७ स्वातंत्र्य वर्ष’ अशी मोहीम सुरू झाली.
ऑलिंपिकच्या इतिहासात भारताला प्रथमच सर्वाधिक सात पदके मिळाली. या अगोदर २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने सहा पदके मिळवली होती. या वेळी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार ब्राँझ अशी सात पदके मिळाली आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here