गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीने हाहाकार उडवला आहे. युरोपातील ग्रीसमध्ये वणवा पेटला आहे.

गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीने हाहाकार उडवला आहे. अॅमेझॉनच्या जंगलात लागलेली आग, ऑस्ट्रेलियातील आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक झाली. यंदा युरोपातील ग्रीसमध्ये वणवा पेटला आहे.
दहा दिवसांपासून या आगीच्या ज्वाळा भडकत असून समुद्र किनाऱ्यापर्यंत याची झळ पोहोचली आहे.
आतापर्यंत शेकडो घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
आगीने रौद्ररुप धारण केल्यानं लोकांना घरे सोडून पळून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.
अॅथेन्सच्या उत्तरेकडील भागात ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली असून आकाशात धुराचे लोळ दिसत आहेत.
आजुबाजुच्या शहरातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ग्रीसमधील तीन मोठ्या जंगलात वणव्यामुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या तीन दशकात उष्णता प्रचंड वाढली असून तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
ग्रीसमधील आगीनं रौद्ररुप धारण केल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी शेकडो अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून काम केलं. आगीने शेकडो कुटुंब बेघर झाली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, 15 विमानांमधून 1450 हून जास्त कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी परदेशातूनही मदतीचा हात मिळाला.
शनिवारी असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, ग्रीसमधील काही भागात वेगवान वारे वाहतील. तसंच 38 अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढेल. या वर्षीची आग ही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूपच विध्वंस करणारी ठरली आहे.
गेल्या दहा दिवसात 56 हजार 655 हेक्टर परिसर आगीच्या भक्ष्य स्थानी पडला आहे. 2008 ते 2020 या काळात 1700 हेक्टर क्षेत्रात आग लागली होती.
ग्रीस आणि तुर्की एक आठवड्याहून अधिक काळ या आगीच्या आपत्तीशी लढा देत आहेत. हा भाग सर्वाधिक तापमानाचा सामना करत आहे. वातवारण बदलाचा परिणाम असल्याचं तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत य़ा आपत्तीमुळे ग्रीसमध्ये दोन आणि तुर्कीत 8 जणांनी प्राण गमावले आहेत. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here