मुंबईतील दादर परिसरात आंदोलन करणाऱ्या रंगकर्मींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विजय पाटकर, मेघा घाडगेसह रंगकर्मींना दादर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातील रंगकर्मींनी सोमवारी दादर इथं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. राज्य सरकारने 56 हजार रंगकर्मींना 5 हजार रुपये मानधन घोषित केलं आहे. मात्र व्यावसायिक कलाकारांची नोंदणी न करता हे मानधन सरकार कसे देणार असा सवाल करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये विजय पाटकर, मेघा घाडगे, मिलिंद दस्ताने, विनय गिरकर, संदेश उमप, उमेश ठाकूर यांच्यासह अनेक कलाकार, बॅकस्टेज कलाकार, मिमिक्री आर्टिस्ट, ऑर्केस्ट्रा कर्मचारी सहभागी झाले होते.

काय आहेत कलाकारांच्या प्रमुख मागण्या?
कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या रकमेत वाढ करावी.
रंगकर्मी हा असंघटित आहे, माथाडी कामगारांच्या धर्तीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी.
मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या कलाकरांना भाडेतत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी रंगकर्मींसाठी विश्रामगृहात सोय असावी.
शासनाने रंगकर्मींसाठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडकोच्या घरांसाठीच्या संख्येत ५% ने वाढ करावी.
निराधार वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी सोबतच त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.
महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका / जिल्हापरिषद हॉस्पिटल मध्ये रंगकर्मींसाठी राखीव ‘बेड असावेत.
Esakal