कोथरुड : रस्त्यावरील खड्डे, कोथरुडकडे उतरणाऱ्या रोडच्या दुरुस्तीचे व उड्डाणपूलाचे सुरु असलेले काम, मुळशीहून येणारी आणि मुंबईहून येणारी वाहने एकाच वेळी महामार्गावर एकत्रित येणे या कारणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामध्ये आता रस्त्याच्याकडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही वाहतूक मंदावत असल्याची सद्यस्थिती आहे. परिणामी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कात्रज बाह्यवळण मार्गावर चांदणीचौक येथे बहुमजली उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. त्यासाठी ठिकठिकाणी खोदाईचे काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद होत आहे. चांदणी चौकात संध्याकाळच्या वेळी व सकाळी नऊ ते अकरा या वेळात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. बावधन वरुन चांदणीचौकाकडे येणारी वाहने व कोथरुडकडून बावधनकडे येणारी वाहने ही कॅफे कॉफी डे जवळ समोरासमोर येतात. येथे वाहतूक नियंत्रक नाही. वाहतूक पोलिस असताना येथील वाहतूक बऱ्यापैकी नियंत्रणात असते परंतु, इतर वेळी वाहनचालक अनिर्बंधपणे वाहने पिटतात तेव्हा वाहतुकीचा बोजवारा उडतो. कोणी कोणाचेच ऐकत नसल्याने मारामाऱ्यांचे प्रसंग याठिकाणी होतात.