पुणे – कोरोना (Corona) निर्बंधांच्या काळात (Restriction Period) जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाखांहून अधिक नागरिकांचे प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे (Rules) पालन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून तब्बल ४३ कोटी ४८ लाख २ हजार ११३ रुपयांचा दंड वसूल (Fine Recovery) केला आहे. यात सर्वाधिक पुण्यातील ५ लाख ५९ हजार ३६० नागरिकांचा समावेश आहे.
गेल्या सोळा महिन्यांत पोलिस, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनांनी ही कारवाई केली. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यातील साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांकडून आतापर्यंत सर्वाधिक २७ कोटी ४५ लाख २२ हजार २८० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी संचारबंदीचा अवलंब करणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे, शाळा, महाविद्यालये, हॉटेल, जीम, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवणे आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने आणि आस्थापना बंद ठेवणे यासारख्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेने शहरातील २७ हजार ७६२ पुणेकरांकडून १ कोटी ३३ लाख ८३ हजार ९३० रुपयांचा, शहर पोलिसांनी ५ लाख ३१ हजार ५९८ नागरिकांकडून २६ कोटी ११ लाख ८८ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या हद्दीत ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने ही दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Esakal