नवी दिल्ली : केंद्रात मंत्रिपद मिळाले की सरकारी बंगले वा मोठ्या सदनिका आणि त्याबरोबर असलेल्या तारांकित सुविधा मंत्र्यांना मिळतात. कॅबिनेट मंत्र्याचा मान तर वेगळाच असतो. त्यांना वेगळ्या प्रकारचे भव्य, ऐसपैस असे बंगले दिले जातात. पण कॅबिनेट मंत्रिपद जाते, त्यावेळी मात्र हे बंगलेही सोडावे लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून अनेक मंत्र्यांना वगळण्यात आले. त्यांना आता बंगले सोडण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. बंगले सोडण्यास विलंब केला, तर त्यांना भाडे भरावे लागू शकते.

मंत्रिमंडळातून वगळलेल्या मंत्र्यांना आधीचे बंगले सोडण्यास सांगण्यात आले असले, तर त्यांना अन्य ठिकाणी घरे निवडण्यासही सांगितले आहे. त्यांना आधीचे बंगले सोडले की त्यांच्या निवासाची अन्यत्र व्यवस्था केली जाणार आहे. नव्याने मंत्रिपद मिळालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना 27 सफदरजंग रोडवरील बंगला देण्यात आला आहे. या बंगल्यात सध्या माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे राहात आहेत. हौसिंग अँन्ड अर्बन अफेअर्स मंत्रायलाअंतर्गत असलेल्या मालमत्ता संचालनालयाने बंगले सोडण्याचे आदेश काढल्याचे वृत्त आहे.

Also Read: दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा अल्पवयीन मुलाकडून खून

माजी मंत्री सदानंद गौडा, डॉ. हर्षवर्धन यांना बंगले साेडण्यास सांगितले आहे. प्रकाश जावडेकर यांना देखील बंगला सोडण्याची नोटिस बजावल्याचे वृत्त आहे. ते 6, कुशक रोडवरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांच्यावर पक्षातील संघटनात्मक मोठी जबाबदारी येणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांचा हा बंगला कायम राहण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना तसेच 1, त्यागराज मार्गावर राहणाऱ्या सदानंद गौडा यांनाही त्यांचा बंगला सोडावा लागेल.

बंगला सोडण्याची पहिली नोटीस पाठविण्यात आली आहे. विहित वेळेत त्यांनी बंगला सोडला नाही, तर त्यांना दुसरी नोटीस पाठविली जाईल. नंतर मात्र त्यांच्याकडून बंगल्याचे भाडे वसूल करण्यात येईल, असे मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Also Read: भावाला अकादमीत पोहोचवण्यासाठी घरातून निघाला, वाटेत मृत्यूने गाठले

लोकजनशक्ती पक्षात बंड झाल्यानंतर रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपतीकुमार पारस यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ चिराग पासवान यांना 12, जनपथ हा बंगला सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा लुटियन्स भागातील एक भव्य बंगला आहे. रामविलास पासवान यांचे अनेक वर्षे या बंगल्यात वास्तव्य होते. हा बंगला पशुपी़तीकुमार यांना देऊ करण्यात आला होता. मात्र त्यांनी तो नाकारला आहे. हा बंगला स्वीकारला असता, तर वेगळा संदेश समाजात गेला असता. त्यामुळे त्यांनी हा बंगला नाकारल्याचे समजते.

कसे असतात बंगले…

कॅबिनेट मंत्र्यांना ल्युटियन झोनमध्ये टाइप आठ प्रकारचा बंगला दिला जातो. सुमारे तीन एकर जागेत ऐसपैस, भव्य असा आठ खोल्यांचा हा बंगला असतो. संसदेच्या निवास समितीमार्फत या बंगल्याचे वाटप केले जाते. बंगल्याच्या आजूबाजूला हिरवळीचा भागही मोठा असतो. कॅबिनेट मंत्रिपद गेल्यानंतर मात्र हा बंगला सोडावा लागतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here