नागपूर : विदर्भातील झाडी बोली, वऱ्हाडी बोली बोलणाऱ्या कलावंतांना मायानगरीमध्ये (mumbai) सहजासहजी काम मिळत नाही, अशी ओरड सांस्कृतिक क्षेत्रातील विशिष्ट वर्गाकडून होते. मात्र, अशांना खोटे ठरवत उपराजधानीतील बहुजन रंगभूमीची कलावंत प्रीती नारनवरे (actor priti narnavare) ‘बॉलिवूड’मध्ये आपले पाय रोवते आहे. नुकतीच ती ‘फिलहाल’ या प्रसिद्ध हिंदी अल्बममध्ये अक्षयकुमारसोबत पडद्यावर झळकली आहे.
Also Read: पॉर्नोग्राफी प्रकरण: न्यायालयाने फेटाळला गहना वशिष्ठचा अटकपूर्व जामिन अर्ज
प्रीतीचे वडील मूळचे नागपूरचे. नोकरीनिमित्त चंद्रपूरमध्ये ते स्थायिक झाले. प्रीती लहानाची मोठी येथेच झाली. महाविद्यालयीन जीवनात तिला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. पुढे कॉस्मेटीकमध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासाठी तीने नागपूर गाठले. हाच तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. मॉडेलिंग करता करता ती बहुजन रंगभूमीशी जोडल्या गेली आणि तीचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. या क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास मुंबई गाठणे आवश्यक आहे, हे तीला माहिती होते.
भाऊ आणि बहिण दोघेही डॉक्टर असल्याने साहजिकच तिच्याकडून पण कुटुंबीय खूप शिकून मोठे होण्याची अपेक्षा व्यक्त करीत होते. मात्र, तिने एक संधी घरच्यांना मागितली आणि त्या संधीचे सोने केले. एका मागोमाग एक काम मिळवत आज तीने दहा नाटक, सात मराठी चित्रपट आणि तब्बल १४ मालिका व वेब सिरीजमध्ये काम केले आहे. या पाच वर्षात अक्षयकुमारसह विक्की कौशल, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, आदित्य रावल (परेश रावल यांचे चिरंजीव) अशा अनेक कलावंतांसोबत काम केले आहे.

Esakal