राशिवडे बुद्रुक : धरण व दाजीपूर अभयारण्याने ओळख निर्माण केलेल्या राधानगरीची दूध आमटी खवय्यामध्ये विशेष पसंत आहे. तिची चव चाखण्यासाठी अनेक पर्यटकांचे पाऊल जाणीवपूर्वक इकडे वळताहेत. याच दूध आमटीने आता राज्याची स्पर्धा जिंकली. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने आयोजित केलेल्या रेसिपी स्पर्धेत आकाश आवटे यांनी पाठविलेल्या दूध आमटीला पहिला क्रमांक मिळाला.

देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते. वरुण इनामदार, डॉ. मोहसिना मुकादम, नीलम नाडकर या तज्ज्ञ परीक्षकांच्या व प्रेक्षकांच्या गुणांमार्फत स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

कणकवली येथील आकाश आवटे हे प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राचे मास्टर शेफ बनले. त्यांनी दूध आमटीची रेसिपी पाठवली होती. ते राधानगरीचे माजी सरपंच कै. शामराव निल्ले यांचे भाचे आहेत. राधानगरीतील जैन समाजातील पारंपरिक व प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे. तिचे वैशिष्ट्ये म्हणजे दुधामध्ये वाटाणा, बटाटा, मसाला, मीठ सर्व काही टाकले जाते, पण दूध फाटत नाही. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या पंधरा विजेत्यांना दहा हजार व प्रशस्‍तिपत्र, द्वितीय क्रमांकाच्या ४० विजेत्यांना पाच हजार रुपये व प्रशस्‍तिपत्र, उत्तेजनार्थ शंभर विजेत्यांना प्रशस्‍तिपत्र अशी बक्षिसे होती.

“येथील चुलीवरील खाद्यपदार्थ, रानभाज्यांची चव चाखायला पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यातून स्थानिक हॉटेल व्यावसायिक, घरगुती खानावळींना फायदा होत आहे. आवटे यांच्या रेसिपीला मिळालेल्या प्रथम क्रमांकामुळे राधानगरीच्या खाद्यसंस्कृतीची नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे राधानगरी तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.”

– रुपेश बोंबाडे, बायसन नेचर क्लब, राधानगरी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here