ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय महिला संघाची ऐतिहासिक पिंक बॉल टेस्ट अनिर्णित राहिली आहे. पहिल्या डे नाईट सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या स्मृती मानधना प्लेयर ऑफ मॅचची मानकरी ठरली. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर 8 बाद 377 धावांवर पहिला डाव घोषीत केला होता. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाची सुरुवात खराब झाली. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन महिला संघाने पिछाडीवर असताना 9 बाद 241 धावांवर आपला पहिला डाव घोषीत केला. त्यानंतर भारतीय महिला संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली.
स्मृती मानधना 31 धावा आणि यश्तिका भाटिया 3 धावांवर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि पूनम राउत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची खेळी केली. शफाली वर्माने 91 चेंडूत 52 धावा करुन बाद झाली. पूनम राउत 41 आणि दीप्ती शर्मा 3 धावांवर खेळत असताना भारतीय महिला संघाने 3 बाद 135 धावांवर दुसरा डाव घोषीत केला. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघासमोर 32 षटकात 272 धावांचे लक्ष्य दिले होते.
हेही वाचा: ‘बॅट नॉट इनवॉल्व ठिकये’; पण बॉल ग्लोव्जला लागला त्याच काय?

ऑस्ट्रेलियन महिला संघाने 15 षटकात 2 विकेट गमावत 36 धावा केल्या. सामना जिंकण्यात भारतीय महिला संघाला अपयश आले असले तरी या सामन्यावर भारतीय महिलांची पकड दिसली. शेवटच्या दिवसांपर्यंत भारतीय महिलांनी आपला दबदबा राखला.
हेही वाचा: IPL 2021: जड्डूचा सिक्सर अन् ऋतूराजची तलवारबाजी; व्हिडिओ व्हायरल
एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिलांनी घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन दाखवलं. त्यानंतर कसोटीत दमदार कामगिरी नोंदवली. ऐतिहासिक कसोटी सामन्यातील ही कामगिरी भारतीय महिला संघाला टी-20 मालिकेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकून वनडेतील मालिका पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय महिला संघ प्रयत्नशील असेल.
Esakal