छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे २ ऑक्टोबर रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते.

‘तारक मेहता..’ या मालिकेमुळे घनश्याम यांना खूप मोठा आधार मिळाला. त्यांना इंडस्ट्रीत सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
एकेकाळी त्यांना फक्त ३ रुपयांसाठी २४ तास काम करावं लागत होतं. आर्थिक परिस्थिती बिकट असताना मुलांच्या शाळेची फी आणि घरभाडं भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे.
कधी शेजाऱ्यांकडून तर कधी मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
‘तारक मेहता..’ या मालिकेतील नट्टू काकांच्या भूमिकेने त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने पालटलं. या मालिकेने त्यांना पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी दिल्या.
मध्यंतरीच्या काळात ते आर्थिक संकटात असल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी स्वत: खुलासा केला होता. ‘मी आर्थिक संकटात नाही. माझ्या नातवंडांसोबत मी घरी चांगला वेळ घालवतोय. इतकंच नव्हे तर मी स्वत: गरजूंची मदत करतोय. मी बेरोजगार नाही आणि कोणत्याच आर्थिक संकटातदेखील नाही’, असं ते म्हणाले होते.
घनश्याम यांनी इतरही हिंदी आणि गुजराती मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘खिचडी’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकांमध्येही काम केलं होतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here