पिझ्झा, पास्ता है मैद्याचे पदार्थ लहान-मोठ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे आता नाचोज, टाकोज हे मॅक्सिकन पदार्थ लोकप्रिय होत आहेत. मक्याच्या पिठापासून केल्या जाणाऱया या पदार्थांमध्ये आपण रोजच्या आहारात खातो तेच घटक असतात. मात्र ते देण्याची आकर्षक पद्धत आणि नेहमीपेक्षा थोडी वेगळी चव यामुळे टाकोज सध्या अनेकांच्या घरी पार्टी मेन्यू असतो. वेगवेगळे बीन्स, भाज्या आणि मक्याच्या पिठाच्या वापरामुळे हा प्रकार पौष्टीकतेकडे झुकणारा आहे. म्हणूनच या मॅक्सिकन पदार्थाकडे म्हणूनच ओढा जास्त आहे.
takojcha इतिहास
टाकोज कसे निर्माण झाले याविषयी विविध माहिती दिसून येते. मानववंशास्त्रीय पुराव्यानुसार मेक्सिको खोऱ्यातील सरोवरात राहणारे स्थानिक लोक परंपरेनुसार लहान माशांनी भरलेले टाकोज खात होते.त्यामुळे मॅक्सिकोत सर्वप्रथम हा पदार्थ खाल्ला गेल्याचे समजले जाते. तर, स्पॅनिश विजेते बर्नाल डियाझ डेल कॅस्टिलोने युरोपीयन लोकांनी पहिल्यांदा केलेल्या टाकोजच्या मेजवानीचे दस्तऐवजीकरण केले. युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा मध्ये दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टॅको दिवस साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस नॅशनल टाको डे म्हणून मानतात. सॅन अँटोनियो पत्रकार रॉबर्टो एल. गोमेझ या दिवसाचे संस्थापक आहेत. हा दिवस त्यांनी 1960 मध्ये पहिल्यांदा साजरा केला असे म्हटले जाते.1967 मध्ये, नॅशनल टाको कौन्सिलने अमेरिकेचे 55 वे अध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांना 36 पौंड टॅको पाठवले.

वेगवेगळे बीन्स, भाज्या आणि मक्याच्या पिठाचा वापर केला जातो.
टाकोज कसे करतात?
आपल्याकडे रोजच्या जेवणात गव्हाची पोळी करतात. अगदी त्याचप्रमाणे मेक्सिकन पदार्थात मक्याचे पीठ, मैदा, मीठ, थोडेसे पाणी एकत्र करून जे पीठ मळले जाते त्याची पोळी बनवतात, त्याला टोर्टीला म्हणतात. त्याचे वेगवेगळे आकार असतात. त्यापासून नाचोज, टाकोज तयार होतात. हा टोर्टीला पांढरा, पिवळा, निळा, लाल आदी रंगाचाही असतो.
आजकाल नाचोज चीप्स सर्रास मिळतात. मोठ्या आयताकृती नाचोजना खाली दुमडून घ्यायचे. जो आकार तयार होतो त्याला टाकोज शेल म्हणतात. या शेलला थोड्याश्या तेलात दोन्ही बाजून थोडेसे भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या मध्यभागी असलेल्या खोलगट जागेत भरपूर शिजलेला राजमा किवा बिन्स,कांदा, टॉमेटो, मश्रुम्स, सिमला मिर्ची, सालसा सॉस आणि आवडीप्रमाणे सॉसेस, मसाला, चीज घालून खायचे. म्हटलं तर त्याला चव येते ती राजमा आणि मॅक्सिकन मसाल्यामुळेच.
हे आहेत प्रकार
हार्ड शेल टाकोज- जेव्हा कॉर्न टॉर्टिला डीप फ्राय केला जातो, तेव्हा हार्ड टॅको शेल तयार केले जातात. ते शेल कुरकुरीत आणि यू-आकाराचे असतात. यू आकार टॅको शेलमध्ये सीझनिंग्ज आणि फाईलिंग्जसाठी वापरले जातात.
सॉफ्ट शेल टाकोज, – हे कॉर्न टॉर्टिला ग्रील्ड किंवा वाफवलेले असतात. मात्र ते दिसायला हार्ड टॅको शेल सारखे असतात.
पफी टाकोज – हे न शिजवलेल्या कॉर्न टॉर्टिलापासून बनवले जातात,
यॅलो टाको शेल, हे फक्त मक्याच्या पिठापासून बनवले जातात. तसेच ते ग्लुटेन मुक्त असतात.
इंडियन टाकोज- यात ब्रेडला तळून त्याला टाकोजसारखा आकार दिला जातो.
Esakal