उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिसांचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना-भवानीपूर येथे रविवारी दौऱ्यावर आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले. त्यानंतर ही घटना घडली. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा अथवा तक्रार दाखल झालेली नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी लखीमपूर खेरी येथे आले होते. त्यानंतर ते मिश्रा यांचे मूळ गाव भवानीपूर येथे जाणार होते. त्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच कृषी कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे शेतकरी ते उतरणार असलेल्या हेलिपॅडपाशी सकाळी आठ वाजताच पोहोचले. त्यांनी हेलिपॅडवर ठिय्या दिला व त्याचा ताबा घेतला. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता मोटारीने मिश्रा आणि मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली. या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय.

घटनास्थळी एका वाहनात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. मात्र, मिश्रा यांनी हा आरोप फेटाळला. या हिंसाचारात भाजपचे तीन कार्यकर्ते आणि एका वाहनचालकाचा मृत्यू झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले. गाड्यांचा ताफा तेथून जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आल्याने दोन मोटारींचे नियंत्रण सुटले व त्या उलटल्या. त्याखाली दोन शेतकरी मृत्युमुखी पडले, अशी माहितीही मिश्रा यांनी दिली.

निघासन उपविभागीय दंडाधिकारी ओम प्रकाश गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकरी आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील कारवाई काय केली जाईल, यावर वरिष्ठ अधिकारी काम करत आहेत. दोन्ही बाजूंनी एफआयआर नोंदवले जाण्याची शक्यता आहे. पारदर्शक चौकशी केली जाईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.”
हेही वाचा: उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींना अटक, काँग्रेसचा दावा
या घटनेनंतर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना पाहून मौर्य यांनी भवानीपूर गावातील दौरा रद्द केला. ज्या दोन गाड्या गर्दीत घुसल्या त्यांना थांबविताना एका महिला पोलिसासह दोन पोलिस जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. त्या विभागाच्या पोलिस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह याही घटनास्थळी रवाना झाल्या . त्याच बरोबर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत हेही लखीमपूरकडे रवाना झाले.
दगडफेकीमुळे मोटारी उलटल्या
राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन मोटारींनी चिरडल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर शेतकरी संतप्त झाले व त्यांनी मोटारी पेटवून दिल्या मोटारीतील लोकांना मारहाण केली. त्या मारहाणीत मोटारीतील चौघांचा मृत्यू झाला.
लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.
Esakal