राजापूर : कोकणात शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन शेतकरी जादा उत्पन्न मिळवत आहे. काही महिन्यांपूर्वी ओणी येथील डॉ. शैलेश शिंदे-देसाई यांनी शंभर फूट संरळ उंच वाढणार्या टुल्डा, बाल्कोवा, लेटीफ, भिमा या बांबूच्या प्रजातींची यशस्वी लागवड केली आहे. या निमित्ताने पूर्व भारतातील राज्यांमध्ये लागवड होणार्या बांबूच्या प्रजातींची कोकणच्या लाल मातीमध्ये रूजवात झाली आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात पीएचडी पूर्ण केल्यानंतर डॉ. शिंदेदेसाई यांनी अर्थाजनासाठी नोकरी स्वीकारली. मात्र, शेतीक्षेत्राला व्यवसायिकरूप देण्याकडे कल असल्याने त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेती क्षेत्राची कास धरली. त्यांनी गेल्या काही वर्षात ओणी येथे शेतीचे नवनवीन प्रयोग केले आहेत. शेततळे, रोपवाटीका, मत्स्यपालन, ग्रामीण पर्यटन, काजू प्रक्रिया उद्योग, गोपालन, आंबा-काजू लागवड आदी विविध व्यवसायातून अर्थाजर्नाचा पर्याय निर्माण करत यशस्वी शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होईल, अशा बांबू लागवडीलाही त्यांनी नुकतीच चालना दिली आहे.

बांबूची तोड झाली असून उत्पन्न सुरू
बांबूला मोठ्याप्रमाणात मागणी असून कमी खर्चात जादा उत्पन्न असे हे पीक आहे. त्यांनी ओणी येथे एक हजार बांबूंच्या रोपांची लागवड केली आहे. त्यात पारंपरिक माणगा, चिवा या बांबूंसह आसाम, मिझोराम, अरूणाचल, मणिपूर आदी राज्यांमध्ये लागवड केला जाणार्या प्रजातींचा समावेश आहे. बांबूची काही बेटं मोठी वाढली आहेत. नुकतीच बांबूची तोड झाली असून उत्पन्न सुरू झाले आहे. बांबूच्या शेतीमध्ये वडील सुभाषचंद्र शिंदेदेसाई, आई विजयादेवी शिंदेदेसाई यांच्यासह पत्नी शुभांगी आणि मित्रपरिवाराने मोलाची साथ दिल्याचेही डॉ. शिंदेदेसाई यांनी सांगितले.
हेही वाचा: धक्कादायक! पुण्यात फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर
दर जास्त मिळतो
बांबूला औद्योगिकदृष्ट्या महत्व असून मोठी मागणी आहे. बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीच्या कामासाठी लागणार्या काठ्यांसाठी सरळ सुमारे शंभर फुट लांब वाढणारे बांबू लागतात. टुल्डा, बाल्कोवा, लेटीफ, भिमा जातीचे बांबू सरळ उभे वाढत असल्याने त्याला दर जास्त मिळतो, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
हे बघा..
-
कोकण कृषी विद्यापीठात पीएचडी पूर्ण
-
अर्थाजनासाठी नोकरी स्वीकारली
-
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीची कास
-
ओणी येथे शेतीचे नवनवीन केले प्रयोग
-
कमी खर्चात जादा उत्पन्न असे हे पीक
-
टुल्डा, बाल्कोवा, लेटीफ, भिमा प्रजातीं
-
बांबूची काही बेटं मोठी वाढली

हेही वाचा: देवाचं दर्शन घेतले, नंतर स्वतःवर वार करत तरुणाने संपवले जीवन
“चांगले उत्पन्न मिळवून देणार्या बांबूला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. हे ओळखून बांबूच्या एक हजार रोपांची लागवड केली. कोकणातील वातावरण या प्रजातींच्या लागवडीला पोषक असल्यामुळे चांगली वाढ होवून उत्पन्नही अधिक मिळेल.”
– डॉ. शैलेश शिंदे-देसाई, शेतकरी
Esakal