पुणे : पंचतारांकीत हॉटेल्समधील लग्न सोहळ्यात चित्रपट संगीत, गाणी वाजविल्यामुळे स्वामीत्व हक्क (कॉपीराईट) कायद्याचा धाक दाखवून दंड वसुली करणाऱ्या कॉपीराईट कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. पंचतारांकीत हॉटेल्स व्यावसायिकांची बैठक घेऊन असे प्रकार पाठीशी न घालता, त्यासंबंधी तत्काळ पोलिसांना माहिती देण्याच्या सुचना पोलिस आयुक्तांनी हॉटेल्स व्यावसायिकांना दिल्या.
पंचतारांकीत हॉटेल्समध्ये घडणाऱ्या या घटनांची पोलिस आयुक्त गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. त्यानंतर फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमीटेड (पीपीएल) व नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपन्यांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार पंचतारांकीत हॉटेल्समध्ये घडत असतानाही हॉटेल्स प्रशासनाकडून मात्र त्याबाबत कुठलीही कारवाई केली जात नव्हती. या पार्श्वभुमीवर सोमवारी दुपारी एक वाजता पोलिस आयुक्तालयात हॉटेल्स व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पुना हॉटेलिर्स असोसिएशनच्या 14 पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यावेळी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये हॉटेल्स व्यावसायिकांनी लग्न सोहळा किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्यावेळी आयोजकांना त्रास होईल, अशा प्रकारांना थारा देऊ नये, केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, कॉपीराईटच्या नावाखालील खंडणी उकळण्यासाख्या गैरप्रकारांना पाठीशी घालू नये, पोलिसांना त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी, गैरप्रकार घडत असल्यास हॉटेल्स व्यावसायिकांनी स्वतः तक्रार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, पोलिसांकडून सहकार्य केले जाईल तसेच हॉटेल्स व्यावसायिकांच्या काही तक्रारी असल्यास त्याही मांडाव्यात, अशा सुचना पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिल्या. त्यास हॉटेल्स व्यावसायिकांनी सहमती दर्शविली.
हेही वाचा: पुढील चार तास पुण्यासह ‘या’ ठिकाणी होणार कोसळधार
“एखाद्याच्या लग्नसोहळ्यात विघ्न आणून कॉपीराईट कायद्याचा धाक दाखवून खंडणी उकळण्याचा प्रकार धक्कादायक होता. त्याची दखल घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच हॉटेल्स व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांनाही याबाबत कडक सुचना दिल्या आहेत. आणखी काही तक्रारी येतील. त्याचीही दखल घेतली जाईल.”
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त.
“”लग्नाच्या आयोजकांना व हॉटेल्स व्यावसायिकांना कॉपीराईट कायद्याची भिती दाखवून संबंधीत कंपन्या पैसे घेत होत्या. पोलिसांनी त्याची दखल घेऊन कारवाई केली. हॉटेल्स व्यावसायिक देखील अशा गैरप्रकारांना थारा देणार नाहीत.”
– विक्रमराज शेट्टी, कार्यकारी सदस्य, वेस्टर्न इंडिया रेस्टॉरंटस् ऍन्ड हॉटेल्स असोसिएशन.
Esakal