दूध पिणे जसे पौष्टिक समजले जाते. तसेच आहार चौरस असणेही नेहमीच फायद्याचे ठरते. आहारात भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या यांच्या बरोबरीने दहीही अनेक जण खाणे पसंत करतात. पण, फॅट जास्त असल्यामुळे डाएट कॉन्शिअस असलेली मंडळी दूध पिणे टाळतात. तर काहींना दही खाणे अजिबात आवडत नाही. पण एका अभ्यासानुसार दूध आणि दह्याच्या नियमित सेवनाने हृहयरोगाचा धोका कमी होतो, असे समोर आले आहे.
स्वीडन येथे झालेल्या एका अभ्यासानुसार जे लोक डेअरीयुक्त पदार्थ खातात त्यांच्यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Cardiovascular disease) होणाऱया आजाराची तीव्रता अतिशय कमी असते.

दूध पिणे
असे केले संशोधन
जगात सर्वात जास्त दुग्धजन पदार्थांचे सेवन आणि खप स्वीडनमध्ये होतो. तेथील वैज्ञानिकांनी स्वीडनमधील एकूण 4,150 लोकांच्या रक्ताचे नमुने तपासून दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरात निर्माण होणाऱया अतिरिक्त फॅटचा अभ्यास केला. त्यानंतर अतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांच्या वापराने किती लोकांचा हृदयविकार, स्ट्रोक किंवा इतर गंभीर आजाराने मृत्यू झाला याची काही वर्ष पाहाणी केली. पाहणीनुसार ज्यांनी आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता त्यांचे प्रमाण नगण्य होते. तसेच त्यांना मृत्यूचा धोकाही नव्हता.

दही खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले समजले जाते.
43,000 लोकांचा अभ्यास
स्वीडनमध्ये झालेल्या या संशोधनाच्या आधारे आणखी तज्ज्ञांनी या विषयावर आधारीत आणखी 17 विषयांना एकत्र करून अभ्यास करून संशोधन केले. हे संशोधन अमेरिका, डेन्मार्क, युकेमधील 43,000 लोकांवर करण्यात आले. याबाबत सिडनीच्या जॉर्ज इन्सिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थचे संशोधक व ज्येष्ठ लेखक मेट्टी मार्कलंड यांनी सांगितले की, डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे निर्माण झालाय असा कोणताही धोका आमच्या अभ्यासात आढळला नाही. उलट ज्यांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले त्यांच्यात हृदयविकाराचा (Cardiovascular disease) धोका आढळला नाही. फॅट्सयुक्त पदार्थांचे जास्त सेवन केलेल्या लोकांच्यात Cardiovascular disease चे प्रमाण खूपच कमी होते. तसेच मृत्यूचाही धोका नसल्याचे संशोधकांच्या अभ्यासात आढळून आले.
हेही वाचा: Navratra 2021 नवरात्रीत उपवास करताय? हे Healthy Fasting चे प्रकार ट्राय करा!
मिळतात भरपूर पोषकतत्वे
तुम्ही कशा प्रकारे दुग्धजन्य पदार्थ खाता यावरही तुमची तब्येत अवलंबून असते, असे अभ्यास सांगतो. दूध, दही, लोणी, चीज, योगर्ट हे पदार्थ हृदयासाठी अतिशय फायद्याचे आहेत. जेवणात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नसेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे हा अभ्यास सांगतो. दुग्धजन्य पदार्थांत अतिरिक्त फॅट्सचे प्रमाण अधिक असले तरी त्यात पोषणमुल्यांचे प्रमाणही तितकेच जास्त असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यामुळे या पदार्थांना पौष्टीक आहार म्हणून पाहिले जावे असेही तज्ज्ञ म्हणतात.
Esakal