मयुर कॉलनी : गोपीनाथ चौक, कोथरूड येथे सकाळी सहा वाजता दोन टेबलवर पुस्तके, शेजारी ठेवलेला वजन काटा, मास्कचा बॉक्स, उंची मोजण्यासाठी टेप इत्यादी साहित्य घेऊन सुरेंद्र दामले (वय ७३) उभे असतात. चौकात व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांचे हसतमुखाने स्वागत करतात.
याबाबत दामले काका म्हणाले “चार वर्षांपूर्वी मी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला तिथं माणुसकी काय असते? याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. तेव्हाच माझ्या मनात आलं, ”आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो, म्हणून कोरोना सुरू होताना मोफत मास्क वाटपास सुरवात केली. सुरवातीला घरच्यांचा विरोध होता म्हणून घरापासून दूर करिष्मा चौकात मास्क वाटप केले. त्यानंतर जवळपास दीडशे पुस्तके विकत घेऊन गोपीनाथ चौकात नागरिकांना घरी वाचनासाठी मोफत उपलब्ध करून दिली. नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला. पुस्तक वाचायला घेऊन जातात आणि परत जमा करताना नवीन दोन तीन पुस्तकं आणून देतात. त्यामुळे सुरवातीला दीडशे पुस्तके उपलब्ध होती आता मात्र जवळपास आठशे पुस्तके मोफत वाचनासाठी उपलब्ध आहेत. त्याच बरोबर व्यायामासाठी येणारे नागरिक नियमित वजन, उंची चेक करत असतात. त्यांच्यासाठी वजन काटा व उंची मोजण्यासाठी टेप उपलब्ध केला आहे.”
हेही वाचा: आईच्या मित्राकडून विश्वासघात, १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

सुरेंद्र दामले खुले ग्रंथालय
“दामले काकांचा आणि आमचा परिचय पुस्तकाच्या माध्यमातून झाला. होईल तेवढं मी सहकार्य करतो. हा उपक्रम समाजपयोगी आहे”
-चेतन अग्रवाल, व्यायाम प्रेमी, महात्मा सोसायटी कोथरूड.
“कोरोना सुरू झाल्यापासून दामले काका नागरिकांसाठी सेवा म्हणून हे कार्य करीत आहेत. व्यायामासाठी येणारे नागरिक मास्क घेतात, पुस्तके वाचनासाठी घेऊन जातात”
– हरी पंडित, रहिवासी, गणंजय सोसायटी कोथरूड.
Esakal